आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांना वा-यावर सोडून डॉक्टर स्वच्छता मोहिमेत, स्वच्छतेचा फार्स करताना मूळ उद्देश बाजूला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेचे निमित्त करत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी गुरुवारी रुग्णांना अक्षरश: वा-यावर सोडले.
रुग्णसेवेच्या प्रमुख उद्देशाला हरताळ फासत जिल्हा शल्य चिकित्सकांसह डॉक्टर व कर्मचारी मोहिमेची औपचारिकता पूर्ण करण्यात व्यग्र होते. जिल्हा रुग्णालयाला एरव्हीही कमी कालावधी देणाऱ्या डॉक्टरांना गुरुवारी स्वच्छता मोहिमेचा आयता बहाणा मिळाला. सकाळी नऊ ते बारा या कालावधीत रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. जिल्हा शल्य चििकत्सक डॉ. एस. एम. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम होत असल्याने डॉक्टर ओपीडीला दांडी मारून या मोहिमेत सहभागी झाले. डॉक्टर कामाला लागल्याने कर्मचाऱ्यांनाही त्यांच्याबरोबर मोहिमेत सहभागी व्हावे लागले. सकाळच्या ओपीडीच्या वेळेतच ही मोहीम हाती घेण्यात आल्याने तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना डॉक्टरांची वाट पहात ताटकळत बसावे लागले. ओपीडी बंद ठेवूनच डॉक्टरांनी या मोहिमेत सहभागी व्हायला हवे होते, तसेच तशा लिखित सूचना दर्शनी भागात लावायला हव्या होत्या, अशी संतप्त प्रतिक्रिया रुग्णांनी व्यक्त केल्या.
उघड्यावर कचरा जाळणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक असल्याची जनजागृती करणाऱ्या डॉक्टरांनीच स्वच्छता मोहिमेतून गोळा केलेला कचरा रुग्णालय परिसरात पेटवून दिला. कचरा पेटवल्याने त्यातून िनर्माण होणाऱ्या धुराचा रुग्णांना व परिसरातील रहिवाशांना त्रास होईल, याचीही जाणीव त्यांनी ठेवली नाही.
"सीएस'कडून प्रतिसाद नाही
रुग्णसेवेकडे दुर्लक्ष करून स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे यांच्यांशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी फोन घेतला नाही. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर ओपीडीला दांड्या मारत असल्याचे 'दिव्य मराठी'ने सातत्याने समोर आणले आहे. मात्र, रुग्णालय प्रशासन सुधारण्यास तयार नाही. लक्ष्य करून एखाद्या डॉक्टरवर थातूर-मातूर कारवाईचे नाटक करून नोटिसा दिल्या जात होत्या. मात्र, ठोस कारवाई होत नाही.