आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील धोकादायक २०० वर्गखोल्या पाडल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या धोकादायक शाळाखोल्या पाडण्यासाठी "दिव्य मराठी'ने दोन वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश येत आहे. मोडकळीस आलेल्या २०० वर्गखोल्या मागील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने पाडण्यात आल्या. त्यामुळे जीव मुठीत घेऊन शिक्षण घेणाऱ्या मुलांचा जीव भांड्यात पडला आहे.

जिल्ह्यातील ज्या शाळा चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वीच्या अाहेत, अशा शाळांमधील वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. या खोल्या वेळीच पाडल्या नाही, तर मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे. ‘दिव्य मराठी’ने यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला. अरणगाव येथील शाळेत स्टिंग ऑपरेशन करून चिमुरडी बालके जीव मुठीत घेऊन कशी शिक्षण घेतात, याकडे लक्ष वेधण्यात आले होते. या संपूर्ण प्रकाराकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचे वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने धोकादायक शाळाखोल्या पाडण्याचे आदेश प्रशासनाने दिले. पण स्थानिक पातळीवर अडचणीत वाढत असल्याने वरिष्ठांचे आदेश बऱ्याचदा धाब्यावर बसवण्याचेही प्रकार झाले. ज्या ठिकाणच्या खोल्या पाडायच्या आहेत, त्या ठिकाणी नवीन खोल्या मंजूर आहे किंवा नाही याची माहिती अद्ययावत केल्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यायी जागेतच आणखी काही दिवस राहावे लागणार आहे.

‘दिव्य मराठी’ने वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी आदेशाची अंमलबजावणी झाली नाही, तर संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यानंतर धोकादायक वर्गखोल्या पाडण्यास गती मिळाली. तालुकास्तरावरील त्रिस्तरीय यंत्रणेवर खोल्या पाडण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार आतापर्यंत २०० धोकादायक वर्गखोल्या पाडण्यात आल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.

मूल्यांकन झाले असल्याने लिलाव करून खोल्या पाडणे आवश्यक आहे. हे करत असताना विद्यार्थ्यांना पर्यायी सुरक्षित जागेत बसण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने अजूनही सुमारे १०६ वर्गखोल्या पाडलेल्या नाहीत. या खोल्या तातडीने पाडाव्यात, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

जानेवारीचा अल्टिमेटम, पुन्हा मार्चअखेर मुदतवाढ
जिल्हापरिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी धोकादायक वर्गखोल्या पाडण्यासाठी जानेवारीचा अल्टीमेटम देऊन कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर पुन्हा मार्चअखेर मुदतवाढ दिली. पण अजूनही १०० टक्के शाळाखोल्या पाडल्या नाहीत, याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
धोकादायकशाळाखोल्या पाडण्यासंदर्भात दिलेली मुदत संपली आहे. यासंदर्भात लवकरच अाढावा घेतला जाणार आहे. त्यात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित केली जाईल, तर इतर कर्मचाऱ्यांवरही चौकशी करून कारवाई केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत यापुढे याप्रश्नी दिरंगाई खपवून घेणार नाही.'' अण्णासाहेबशेलार, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

जिल्ह्यातील ८० शाळांमध्येच होता धोका
जिल्ह्यातसुमारे साडेतीन हजार शाळा असल्या, तरी ८० शाळांमधील ३०६ खोल्या धोकादायक आहेत. त्यापैकी सुमारे २०० पाडण्यात आल्या आहेत. उर्वरित १०६ शाळांपैकी बहुतेक शाळा पाडल्या आहेत, पण त्याचा अहवाल आल्याने कागदोपत्री १०६ खोल्या पाडणे बाकी असल्याचे दिसून येत आहे.
बातम्या आणखी आहेत...