आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेच्या राजकारणाला लागले फुटीचे डोहाळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असले, तरी रिंगणात उमेदवार उतरवणारी ठरावीक मंडळे अस्वस्थ झाली आहेत. संधी मिळाल्याने काही कार्यकर्त्यांना फुटीचे डोहाळे लागले आहेत. चिन्हवाटपाच्या वेळात राखीव जागेवरील उमेदवार पळवण्याचाही प्रयत्न झाला. सत्तेसाठी सुरू असलेल्या या राजकारणात जिरवाजिरवीसाठी "फिल्डिंग' लावली जात आहे. याचा फटका गाफील राहिलेल्या मंडळांना बसणार आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट झाले. निवडणूक अर्ज दाखल होण्याच्या दिवसापासून ते उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत गंमतीजमती पहायला मिळाल्या. सर्वच मंडळांनी स्वत:ची ताकद दाखवून देण्यासाठी इच्छुकांची फळीच उभा केली. त्याचा परिणाम म्हणून विक्रमी पावणेसहाशे उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले. स्वबळावर निवडणूक लढवण्याची वल्गना करून दुसरीकडे चर्चेची दारे खुली केली गेली.

गुरुकुल, गुरुमाउली, सदिच्छा मंडळाने युती-आघाडीचेही आवाहन केले होते. गुरुमाउलीचा आत्मविश्वास शिगेला पोहोचल्याने त्यांच्याकडून सन्मानजनक जागावाटप होणे अशक्य असल्याचे इतर मंडळांच्या लक्षात आले. एखादे मंडळ चर्चेला तयार झाल्यानंतर जागावाटपाच्या मुद्द्यावर जास्तीची अपेक्षा ठेवू नका, असेही खासगीत सांगितले जात होते. काही मुरब्बी मंडळींना, तर गुरुमाउलीने आमच्यात विलीन व्हा, असा सल्लाही दिला होता. धास्तावलेल्या मंडळाने इतर मंडळांकडे चाचपणी सुरू केली.

रावसाहेब रोहोकले निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांना केवळ अध्यक्ष व्हायचंय, अशी टीकाही गुरुकुलच्या नेत्यांनी केली. सद्यस्थितीत गुरुमाउलीचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला असला, तरी सदिच्छा मंडळानेही दोन्ही ऐक्य मंडळे, गुरुसेवाला बरोबर घेऊन महाआघाडी उघडली. या महाआघाडीतही विकास मंडळाच्या जागांवरून बिघाडी होण्याची चिन्हे निर्माण झाली. त्यामुळे सोमवारी (१५ फेब्रुवारी) सायंकाळी उशिरापर्यंत बंद खोलीत मनधरणी सुरू होती, अशी माहिती समजली.

नॉनटिचिंग राखीव जागेवरील उमेदवारावरून गुरुमाउली सदिच्छा मंडळात चांगलीच रस्सीखेच झाली. या उमेदवाराने चिन्ह मशाल घ्यायचे की नारळ, याविषयी चवीने चर्चा सुरू होती. अखेर हा उमेदवार सदिच्छाच्या वाट्याला आला. गुरुकुल मंडळाने सहा जागांचा त्याग करत बहुजन मंडळाला बरोबर घेतले. बँकेच्या राजकारणात विकास मंडळाच्या तीन जागांवर उमेदवार मिळणेही कठीण झाले. या घडामोडींमुळे सामान्य सभासद मात्र अस्वस्थ झाला आहे. यापूर्वी शिंगणापूर येथे झालेल्या मेळाव्यातील गर्दीचे दर्शन चांगलेच आठवणीत असल्याने प्रचार मेळाव्यातील गर्दीत दर्दी किती होते याचाही कानोसा नेत्याने घेतला. मूठभर नेत्यांच्या रंगीबेरंगी कला सामान्य सभासद काठावर बसून पहात आहेत. २८ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी हे सभासद बँकेचे शिलेदार ठरवणार आहेत.

नेत्याचेशाळेतील मुख्याध्यापक रिंगणात
गुरुकुल,बहुजन युतीचे शिक्षक नेते संजय कळमकर यांच्या राहुरी तालुक्यातील शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण सोनवणे गुरुमाउली मंडळाकडून विकास मंडळाची निवडणूक लढवणार आहेत. ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.

विकासमंडळासाठी ६४ उमेदवार रिंगणात
शिक्षकविकास मंडळासाठी ६४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सोमवारी सुमारे २०० उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर हे चित्र स्पष्ट झाले आहे. मंगळवारी चिन्हे वाटप करण्यात आली. शिक्षक बँकेच्या निवडणुकीत चुरस असताना विकास मंडळ ताब्यात घेण्यासाठी सर्वच मंडळांनी मोर्चे बांधणी केली आहे. एकाच दिवशी दोन्ही निवडणुका होणार आहेत.

शाळेच्या वेळेत प्रचार केला, तर निलंबन...
^प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा परिणाम जिल्हा परिषद शाळांमधील कामकाजावर होऊ नये, यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे, जर कोणी शाळेच्या वेळेत निवडणुकीचा प्रचार करत असेल, तर संबंधित शिक्षकाला, तसेच अधिकाऱ्याला निलंबित केले जाईल. आमची निवडणुकीवर करडी नजर असणार आहे.'' अण्णासाहेब शेलार, उपाध्यक्ष,जि.प.