आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Primary Teachers Bank News At Nagar, Divya Marathi

चपला, बाटल्या आणि तक्क्यांची फेकाफेक! घाईघाईत विषय मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत गुरुजींनीच एकमेकांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. घाईघाईत विषय मंजूर करून संचालक मंडळाने राष्ट्रगान सुरू केले, पण विरोधी मंडळातील कार्यकर्त्यांनी माइक हिसकवून घेतला. ‘वंदे मातरम्’ सुरू असतानाच संचालकांनी पळ काढला. वीस मिनिटांच्या सभेत गोंधळ होऊन चपला, बाटल्या, लोड, तक्क्या व केळ्यांचा मारा करण्यात आला.
शिक्षक बँकेची वार्षिक सभा रविवारी सकाळी अकरा वाजता यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सत्ताधा-यांचे पितळ उघडे करण्याचा डाव विरोधकांनी आखला होता, तर सभेत सर्व विषय मंजूर करून घेण्याचा चंग सत्ताधा-यांनी बांधला होता. सकाळी साडेदहापासूनच विरोधी मंडळांनी सभागृहात, तसेच बाहेर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कोअर बँकिंगसाठी झालेल्या खर्चाच्या मुद्द्यावरून आठ दिवसांपासून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते. सभागृहात सभा सुरू होण्यापूर्वीच विरोधी गटातील शिक्षक नेते संजय कळमकर, संजय धामणे, रावसाहेब रोहोकले, संजय निमसे आदी नेत्यांनी व्यासपीठाचा ताबा घेतला. बँकेचे अध्यक्ष महादेव गांगर्डे व अन्य संचालकांनी त्यांना खाली जाण्याची विनंती करून सभा सुरू करण्याची सूचना केली. त्यावर कळमकर म्हणाले, आम्ही खाली उतरायला तयार आहोत, पण कोअर बँकिंगसाठी किती निविदा आल्या, तसेच खर्चाचा खरा आकडा सांगा. त्यावर गांगर्डे म्हणाले, सभा सुरू होऊ द्या, सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ. रोहोकले म्हणाले, संचालक सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. व्यासपीठावर गर्दी करू नका; अन्यथा मी सभागृहाबाहेर जाईन. संचालकांनी उत्तरे न देता बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, असा इशारा काही सभासदांनी दिला. विरोधी गटातील एका कार्यकर्त्याने निषेध म्हणून दहन करण्याकरिता पुतळा आणला होता, पण पोलिसांनी त्याच्यासह काहींना ताब्यात घेतले. त्यांना अगोदर सोडा, दडपशाही करू नका; अन्यथा येथे उद्रेक होइल, असा इशारा कळमकर यांनी दिल्यानंतर संबंधिताला सोडण्यात आले.
गांगर्डे यांनी इतिवृत्त वाचून कायम करण्याचा विषय मांडला. त्यावर संपूर्ण सभागृहाने विषय नामंजूर असल्याचे एक आवाजात सांगितले. त्यामुळे गोंधळलेल्या संचालकांनी विषय वाचून होऊ द्या, त्यावर चर्चा करू, प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली जाईल, असे सांगितले. परंतु विरोधक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. व्यासपीठाच्या दिशेने चपला, बाटल्या, तक्के व केळी फेकण्यात आली.
संचालकांनी गोंधळातच सर्व विषय मंजूर केले. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. विरोधकांनी व्यासपीठाकडे धाव घेतली. त्याच वेळी गांगर्डे यांनी राष्ट्रगान सुरू केले. पण एका सभासदाने त्यांचा माइक हिसकावून घेतला. ‘वंदे मातरम्’ सुरू झाले त्या वेळी गोंधळ सुरू होता. संचालकांनी परिस्थिती पाहून वंदे मातरम् सुरू असतानाच व्यासपीठावरून पळ काढला. त्यांच्यामागे काही विरोधी कार्यकर्ते धावले. सत्ताधारी व काही विरोधी सभासदांकडून राष्ट्रगानाचा अवमान झाल्याने सभासद अवाक् झाले.
सभेत गोंधळ सुरू असताना व्यासपीठाच्या दिशेने केळी, बाटल्या भिरकावल्या गेल्या. वृत्तछायाचित्र सचिन शिंदे यांच्या तोंडावर पाण्याची बाटली लागली. त्यांच्या कॅमे-याचेही नुकसान झाले. जखमी झालेल्या शिंदे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यांना सभाच चालू द्यायची नव्हती...
सभेचे वातावरण संजय कळमकर व रावसाहेब रोहोकले यांच्यामुळे बिघडले. कर्जावरील व्याजदर कमी केल्याने सभासद खुश आहेत. तथापि, विरोधकांनी धक्काबुक्की करत गादीवरील तक्के फेकून गोंधळ घातला. त्यांना सभाच चालू द्यायची नव्हती. बाहेरचे गुंडही विरोधकांनी बोलावले होते.’’
गहिनीनाथ शिरसाठ, सत्ताधारी संचालक
अवमानप्रकरणी कारवाई करणार
सभासद सभाच सुरू करू देत नव्हते. आम्ही विनंती केल्यानंतर सभा सुरू झाली. पण संचालक मंडळाने सभासदांचा विश्वासघात केला. संचालक मंडळाने प्रथम जन गण मन सुरू केले. नंतर वंदे मातरम्चे रेकॉर्डिंग लावले. वंदे मातरम् सुरू झाल्यानंतर त्यांनी पळ काढला. हा राष्ट्रगानाचा अवमान असून कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई केली जाईल. सभेचे इतिवृत्त जर जिल्हा उपनिबंधकांनी मंजूर केले तर पहिला मोर्चा उपनिबंधक कार्यालयावर जाईल. ’’
रावसाहेब रोहोकले, विरोधी संचालक
सचिवाविना झालेली सभाच बेकायदेशीर
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केशव थोरात यांनी राजीनामा दिला असताना सभेतील गोंधळ लक्षात घेऊन त्यांना ऐनवेळी बोलावण्यात आले. पहिलाच विषय सभागृहाने नामंजूर केला असताना टेपरेकॉर्डवर राष्ट्रगान सुरू करून संचालकांनी व्यासपीठावरून धूम ठोकली. ही सभा सचिवाविना झाल्याने ती बेकायदेशीर आहे. ’’
संजय कळमकर, विरोधी शिक्षक नेता
प्रश्न : राष्ट्रगानाचा अवमान कुणाकडून झाला ?
उत्तर : राष्ट्रगान सुरू झाल्यानंतर आमच्या हातातील माइक हिसकावून विरोधकांनी अवमान केला. आम्ही राष्ट्रगानाचा मान राखत व्यासपीठाजवळच थांबलो होतो.
प्रश्न : सभागृहाने पहिलाच विषय नामंजूर केला ?
उत्तर : शिक्षक बँकेच्या सभासदांच्या सर्व मागण्या मंजूर केल्याने सर्व विषय मंजूर झाले आहेत.
प्रश्न : चर्चा न करताच सभा का गुंडाळली ?
उत्तर : आम्ही कर्जावरील दीड टक्का व्याजदर कमी केला. विरोधकांकडे प्रश्नच शिल्लक नव्हते. केवळ गोंधळ घालण्याचा त्यांचा उद्देश होता.
प्रश्न : व्यासपीठावरून पळ का काढला ?
उत्तर : समोरून बाटल्या व इतर वस्तू फेकल्या जात असल्याने आम्ही तेथेच बाजूला थांबलो होतो.
प्रश्न : संचालकांना मारहाण झाली का ?
उत्तर : मारहाण नाही, पण धक्काबुक्की झाली.