आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तोडफोड होऊनही गुन्हा दडपण्याचा प्रकार सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बुधवारी (१६ मार्च) सायंकाळी दोघांनी तोडफाेड केली. ही तोडफोड करणारे याच कार्यालयातील दोन कर्मचारी होते. या राड्यात कार्यालयातील सीसीटीव्ही, कॉम्प्युटर, खुर्च्या यांचे नुकसान झाले. नंतर एकाने गुरुवारी सकाळी अधिकाऱ्याकडे माफी मागून आजारपणाचे औषधाचा डोस जास्त झाल्याचे कारण सांगत चूक झाल्याची कबुली दिली. या घटनेला दोन-तीन दिवस उलटले असूनही अद्यापपर्यंत पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आलेली नाही. याप्रकरणी चौकशी करून निर्णय घेणार असल्याचे सुरुवातीला अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास कृषी सहायक अशोक दहिफळे यांनी अचानक कार्यालय परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही वायर, कॉम्प्युटर तोडण्यास सुरुवात केली. हा प्रकार चालू असताना कार्यालयात उपस्थित असणारे कर्मचारी सुरक्षारक्षक कोणीही मध्ये पडले नाही. घटना घडली तेव्हा प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांना एका कर्मचाऱ्याने तातडीने फोन करून झालेला प्रकार सांगितला घटनेची माहिती दिली. त्यांनतर रात्री उशिरा प्रभारी अधीक्षक बऱ्हाटे कार्यालयात पोहोचले.
सीसीटीव्हीचे फुटेज पाहून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यामध्ये दहिफळे आणि कृषी अधीक्षक कार्यालयातील वाहनचालक शिंदे हे दोघेही तोडफोड करताना दिसत असल्याचे सांगण्यात आले. बुधवारी रात्रीपर्यंत या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देण्यात आलेली नव्हती. नंतर गुरुवारी सकाळी बऱ्हाटे यांनी कार्यालयात येऊन इतर कर्मचाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेऊन संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यासाठी त्यांनी कार्यालयातील अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती. कार्यालयात झालेल्या बैठकीत दहिफळे यांनी माफी मागून पोलिसांमध्ये तक्रार करण्याची विनंती केली. रक्तदाबाच्या आजारावर आपण औषधे घेत असून त्यांचा जादा डोस झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांना सांगितले. वाहनचालक शिंदे मात्र अधिकाऱ्यांसमोर आलेच नाहीत. इतर अधिकाऱ्यांनीही तोडफोड करणाऱ्या कर्मचाऱ्याला माफ करावे, अशी भूमिका घेतली. त्यानंतर बऱ्हाटे यांनी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंिधत प्रकारणाची योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा, असा आदेश दिला.

कृषी अधीक्षक कार्यालयात झालेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे कार्यालयाच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. हा प्रकार बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने केला असता, तर अद्यापपावेतो, पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असता. पण, कार्यालयातील लोकांनीच तोडफोड केल्यामुळे या प्रकरणावर पांघरुण घालण्याचा प्रकार सुरू आहे. एक प्रकारे हा गुन्हा दडपण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कारवाईची गरज आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात तीन दिवसांपूर्वी असा सिनेस्टाइल पद्धतीने राडा करण्यात आला. त्यामध्ये सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

गुन्हा दडपण्याच प्रकार
सरकारी कार्यालयात सर्वसामान्याचे काम झाले नाही, एखाद्या संघटनेने आंदोलन केले, तरी कार्यालयातील कर्मचारी किंवा अधिकारी "सरकारी कामात अडथळा' अाणल्याचा गुन्हा दाखल करतात. कृषी अधीक्षक कार्यालयात झालेली तोडफोड म्हणजे सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्याचाच प्रकार आहे. एवढा गंभीर प्रकार असूनही तीन दिवस उलटले, तरीही अद्यापपर्यंत पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आलेली नाही. फिर्याद देणे हा गुन्हा दडपण्याचाच प्रकार झाला. याबाबत विचारणा करण्यासाठी प्रभारी कृषी अधीक्षक बऱ्हाटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल स्वीच ऑफ होता.

तोडफोडीचे कारण काय?
कृषी अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, यासाठी या कार्यालयाच्या परिसरात आठ दिवसांपूर्वी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला वेळेवर येऊन कार्यालयात थांबावे लागत आहे. त्यामुळे टाईमपास करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आळा बसला आहे. कार्यालयात बसवलेले सीसीटीव्ही आपल्यावर नजर ठेवण्यासाठीच लावले असल्याची भावना काही कर्मचाऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळेच कृषी अधीक्षक कार्यालयाची तोडफोड झाल्याची चर्चा कार्यालयाच्या परिसरात आहे. याबाबत जर पोलिसांत तक्रार केली, तर निदान पोलिस तपास करून तोडफोडीचे नेमके कारण काय याचा तरी शोध लागू शकतो.
बातम्या आणखी आहेत...