आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्याने व मैदानांसाठी एकवटले नगरकर, प्रशासनाला दीड महिन्याचा अल्टिमेटम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- खेळाची मैदाने व उद्यानांकडे महापालिका प्रशासनाने वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले. उपलब्ध मोकळी मैदाने विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांना वाटली. त्यामुळे फिरण्यासाठी व मुलांना खेळण्यासाठी शहरात बोटावर मोजण्याइतकीच उद्याने व मैदाने उरली आहेत.
हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी "दिव्य मराठी'ने सुरू केलेल्या अभियानात नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. शहर विकासासाठी धडपडणारे शेकडो नागरिक "जन आंदोलन' समितीच्या माध्यमातून एकत्र आली आहेत. उद्याने व मैदानांबाबत जाब विचारण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी महापालिका कार्यालयावर मोर्चा काढला. दीड महिन्यात उद्याने व मैदानांचा प्रश्न सुटला नाही, तर मनपा कार्यालयाचेच मैदान करू, असा इशारा जन आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
नगर शहराचा विस्तार वाढला असून लोकसंख्या साडेचार लाखांपेक्षा अधिक झाली आहे. परंतु शहरातील उद्याने व खेळाच्या मैदानांची संख्या मात्र आहे तेवढीच आहे. उलट काही मोकळ्या मैदानांवर शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी ताबा मिळावला. महापालिकेने या संस्थांना मोकळी मैदाने अक्षरश: खिरापतीसारखी वाटली. अजूनही हा प्रकार सुरूच आहे. बुधवारी होणाऱ्या मनपाच्या विशेष सभेत पुन्हा सात मोकळी मैदाने काही संस्थांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. शहरातील उद्याने व खेळाच्या मैदानांचा प्रश्न सोडवण्यासाठी "दिव्य मराठी'ने अभियान हाती घेतले आहे. अभियानामार्फत शहरातील उद्यानांची सद्य परिस्थिती, उद्याने उभारण्यासाठी व ती टिकवण्यासाठी येणाऱ्या अडचणी, या अडचणी सोडवण्यासाठी नागरिकांसह महापालिकेने काय केले पाहिजे अशा अनेक बाबी समोर आल्या. नागरिकांनी या अभियानाचे स्वागत करून त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. नगर विकासासाठी धडपडणाऱ्या जन आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मनपा कार्यालयावर धडक मोर्चा काढला. बोटावर मोजण्याइतकी जी उद्याने व मैदाने आहेत, त्यांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत जनआंदोलनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी आयुक्त विलास वालगुडे यांना जाब विचारला. दीड महिन्यात शहरातील उद्याने व मोकळ्या मैदानांची सुधारणा झाली नाही, तर महापालिकेच्या सर्व कार्यालयांचे रुपांतर खेळाच्या मैदानांमध्ये करण्याचा इशारा जनआंदोलनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य सचिव अशोक सब्बन, मुकुंदनगर विकास समितीचे अध्यक्ष अर्शद शेख, जमाते इस्लामी हिंदचे अनिस शेख, अंजू मुल्ला, पादीर इंजिनिअर, सलीम सहारा, इस्माईल शेख, वसीम शेख आदी उपस्थित होते.

भूखंडांचे श्रीखंड-
बुधवारी होणाऱ्या मनपाच्या विशेष सभेत सात मोकळे भूखंड काही शैक्षणिक व सामाजिक संस्थांना देण्याबाबतचे प्रस्ताव आहेत. त्यात केडगावातील श्रीरामदेव भक्त मंडळाला सांस्कृतिक भवनासाठी, विधाते विद्यालयास माळीवाडा येथील भूखंड, केडगावातील हनुमान भक्त मंडळाच्या बालक मंदिर व सभागृहासाठी, महिला जीम व सांस्कृतिक भवनसाठी भूखंड देण्याबाबत निर्णयाची शक्यता आहे.

वाटपाचे निकष हवेत
महापालिका मागील काही वर्षांपासून खिरापतीप्रमाणे शहरातील भूखंडांचे वाटप करत आहे. त्यामुळे शहरात नागरिकांना फिरण्यासाठी व मुलांना खेळण्यासाठी उद्याने तसेच मैदाने उरले नाहीत. भूखंड देताना त्यासाठी निकष व नागरिकांची ना हरकत महत्त्वाची आहे. हे निकष आधी ठरवले जावेत.'' अशोक सब्बन, राज्य सचिव, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन.

कार्यालयांचे मैदान-
शहरातील उद्याने व मैदानांचा प्रश्न गंभीर झाला आहे. दोन महिन्यांनी शाळांना सुट्या लागतील. उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना खेळण्यासाठी शहरात एकही चांगले मैदान नाही. येत्या दीड महिन्यात उद्याने व मैदानांची उभारणी व आहे त्या उद्यानांची दुरूस्ती झाली नाही, तर महापालिकेच्या सर्व कार्यालयांचीच मैदाने करू.'' अर्शद शेख, अध्यक्ष, मुकुंदनगर विकास समिती
जन आंदोलन समितीचा आक्षेप-
शहरातील सर्वच उद्यानांची दुरवस्था
प्रमुख दोन उद्यानेही मोजताहेत शेवटची घटका
मनपाच्या दुर्लक्षामुळे मोकळ्या मैदानांवर अतिक्रमण
उद्यानांचे कर्मचारी अधिकारी - पदाधिका-यांच्या दिमतीला
उद्यानांसाठी भरीव आर्थिक तरतूद नाही
उद्यानांची देखभाल करणारे कर्मचारी केवळ कागदोपत्रीच
उद्यानांअभावी पर्यावरणाची मोठी हानी
वृक्ष कराची वसुली जोरात, वृक्ष लागवड मात्र नाही