आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटे अंधाराचे जाळे: वीज वाचवू; भारनियमनाचे संकट टाळू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. मात्र, ती जपून वापरण्याचा मंत्र आपण विसरलो आहोत. त्यामुळे विजेचा तुटवडा जाणवतो. राज्यात कायम विजेचे भारनियमन करावे लागते. भारनियमनाचे हे संकट कमी करण्यासाठी सर्वांना वीज बचतीचा मंत्र जपून तो तातडीने अमलात आणावा लागणार आहे तसेच पारंपरिक ऊर्जा स्रोताबरोबरच अपारंपरिक ऊर्जास्रोतांकडे वळावे लागेल.
कोणतीही निवडणूक आली, की ‘मोफत वीज’ व ‘भारनियमनमुक्ती’च्या घोषणा दिल्या जातात. ते शक्य नाही, हे माहिती असूनही असे केले जाते. आपल्याकडे कोळसा, नैसर्गिक वायू, जल व अणूउर्जेपासून वीज बनते. हे सर्वच पर्याय अत्यंत महागडे ठरत आहेत. उच्च दर्जाच्या कोळशाचा कायम तुटवडा असतो. त्यामुळे औष्णिक वीजनिर्मितीचे संच कधीच पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत. पाऊस लहरी झाल्याने व धरणांतील पाण्याचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याने जलविद्युत प्रकल्पही उन्हाळ्यात बंद पडण्याची स्थिती असते. नैसर्गिक वायूची मक्तेदारी खासगी कंपन्यांकडे आहे. त्यामुळे विजेचा दर ते ठरवतील तसा असेल. शिवाय पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक वायू संपल्यावर काय, हा प्रश्न आहेच. अणूऊर्जेचा पर्याय धोकादायक आहे. रशियातील चेर्नोबिल व जपानमधील फुकुशिमा दाइची ही त्याची ज्वलंत उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रगत राष्ट्रे अणूऊर्जेवरील अवलंबित्व कमी करण्याबाबत अतिशय गांभीर्याने विचार करत आहेत. वीजनिर्मिती करणाऱ्या अणूभट्ट्यांना लागणारे इंधन बाहेरच्या देशांतून आयात करावे लागते. कारण तितके इंधन आपण तयार करू शकत नाही. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला परकीय चलन खर्च करावे लागत आहे.

ही सर्व परिस्थिती पाहता अपारंपरिक ऊर्जास्रोत म्हणजे सौर व पवन ऊर्जेकडे वळावे लागेल. सुदैवाने दोन्ही स्रोत आपल्याकडे मुबलक आहेत. अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करण्यासाठी सुरुवातीची गुंतवणूक मोठी असते. त्यामुळे त्यांचा वापर करण्यास लोक फारसे उत्सुक नसतात. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारनेही गांभीर्याने धोरणे राबवण्याची गरज आहे. वीज वाचवा म्हणजे ती वाढेल, या मंत्राचा सर्वांनीच गांभीर्याने अवलंब केल्यास सर्वांना वीज मिळेल व देशाचे बहुमूल्य परकीय चलनही वाचेल.

सहभागातून समस्यामुक्ती
आधुनिक काळात अन्न, वस्त्र, निवारा या यादीत आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे. ते म्हणजे वीज. काळ बदलतोय, तशा आपल्या गरजा वाढत आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी वीज अत्यावश्यक झाली आहे. कल्पना करा. आपण कोठे तरी बाहेर गेलो आहोत. आपल्या मोबाइलची बॅटरी संपली आहे. तेथे वीज नाही, हे नुसते ऐकले तरी आपला जीव कासावीस होतो.
विजेच्या उपलब्धतेच्या बाबतीत अत्यंत असमतोल आहे. काही ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागात ती अत्यंत कमी वेळेसाठी उपलब्ध असते. त्यामुळे शेती संकटात येते. दुसरीकडे मुंबई, नागपूर, पुण्यासारख्या मोठ्या शहरांत ती २४ तास उपलब्ध असते. तेथे तिची उधळपट्टी सुरू असते. या दोन टोकांत संघर्षाची परिस्थिती निर्माण होत आहे. ती न होण्यासाठी वीजबचतीसाठी सर्वांनीच गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. घरातील विद्युत उपकरणे चांगल्या ब्रँडची वापरणे, पिवळा प्रकाश देणाऱ्या बल्बचा वापर पूर्ण थांबवणे, फ्लुरोसंट ट्यूबचा वापर कमी करणे किंवा त्या हटवून स्लिम लाइन ट्यूब किंवा एलईडी बल्ब वापरणे असे उपाय करता येण्यासारखे आहेत. वीजबचतीसाठी एलईडी तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे. सध्या एलईडी बल्ब, पॅनेल महाग आहेत, पण जसे त्यात नवीन उद्योजक येतील तशा त्यांच्या किमतीही कमी होतील. वीज वाचली, तर तिचे समान वितरण करता येईल. त्यामुळे प्रगतीला हातभार लागेल. विजेची बचत हीच तिची निर्मिती, हे सूत्र समोर ठेवून वीजबचतीचा मंत्र जपूया...

घरातच करा भारनियमन
आपल्याकडे सूर्यप्रकाशाचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करा. ज्यावेळी विजेचे काम नसेल, तेव्हा घरातच प्रत्येक नागरिकाने विजेची उपकरणे बंद ठेवून घरातच भारनियमन करायला हवे. आपल्या प्रयत्नांनी एखाद्याच्या घरातील अंधार दूर होत असेल तर हे प्रयत्न करायला हरकत नाही. यासाठी प्रत्येक नागरिकाने विजेचे महत्त्व ओळखून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. प्रत्येक जण विजेबाबत जागरूक झाला, तर वीज बचतीला मोठा हातभार लागेल.'' व्ही. पी. जोगी, उपकार्यकारी अभियंता, महावितरण
चाेरी टाळा, नियमित बिल भरा
काम नसेल तेव्हा ते विजेची उपकरणे बंद केल्यास वीज वाचेल. वीजचोरीमुळे गळतीचे प्रमाण वाढत आहे. ग्राहकांनी नियमित वीजबिल भरल्यास प्रत्येकाला वीज मिळेल. प्रत्येक नागरिकाने चंगळ थांबवून विजेचा गरजेपुरताच वापर केल्यास वीजटंचाई जाणवणार नाही. प्रत्येक नागरिकाने वीज बचतीची मोहीम आपल्या घरापासून कार्यालयापर्यंत राबवायला हवी.''
धनंजय भामरे, कार्यकारी अभियंता, महािवतरण.
सावेडी उपकेंद्र : निधी आहे, पण जागा नाही
सावेडी उपकेंद्रासाठी तीन वर्षांपूर्वी निधी आला आहे. मात्र, जागा मिळत नसल्याने हे उपकेंद्र रखडले आहे. सर्वांना अखंड वीज हवी आहे. मात्र, जागा देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. एखाद तयार झाला, तर नेत्यांकडून आंदोलने केली जातात. महावितरणने स्वत:च्या जागेत केडगाव व पॉवरहाऊस येथे सबस्टेशन उभारले आहे. सावेडी उपकेंद्र झाले नाही, तर त्यात नगरकरांचे नुकसान आहे. नागरिकांना पुरेशा प्रमाणात वीज मिळणार नाही. हे उपकेंद्र झाल्यास १० ते १५ वर्षांचा विजेचा प्रश्न निकाली निघेल. ओव्हरलोड, वारंवार होणारे ब्रेकडाऊन यापासून सुटका होईल. एकाच लाइनवर दोन वाहिन्यांच्या लोडची समस्या राहणार नाही.