आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: नगरमध्ये कांदा उत्पादकांना ‘अच्छे दिन’; विक्रमी 3500 भाव, राज्यात अव्वल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
वाळकी - वर्षभर १०० ते ३०० रुपये क्विंटल बाजारभाव पाहिल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून कांदा उत्पादकांना ‘अच्छे दिन’ येऊ लागले आहेत. गुरुवारी  लिलावासाठी नगर बाजार समितीत तब्बल २२ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. उच्च प्रतीच्या कांद्याला विक्रमी ३५०० रुपये क्विंटल भाव मिळाला. हा बाजारभाव राज्यात अव्वल ठरला.
 
नगर बाजार समितीत ग्रेडींग केलेला बंद गोण्यांमधील कांदा स्वीकारला जातो. जिल्ह्यासह येवला, गंगापूर, आष्टी, बीड, पैठण, शिरूर भागातूनही मोठ्या कांदा नगरला येतो. वर्षभर कांदा बाजार आपटलेला होता. प्रति क्विंटल १०० ते ३०० रुपये दर मिळत होता. 
 
 गेल्या आठ दिवसांपासून मात्र कांद्याचा बाजारभाव वाढू लागला. १६००, १८००, २२०० रुपये असे वाढत गुरूवारच्या लिलावात विक्रमी ३५०५ रुपयांपर्यंत व्यापाऱ्यांनी बोली लावल्या. दादेगाव (ता. आष्टी) येथील शेतकरी राजू विधाते यांच्या कांद्याला विक्रमी ३५०५ रुपये, तर युनूस शेख कानडगाव (ता. गंगापूर) यांच्या कांद्याला ३५०० रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला २४०० ते २९५०  व तीन नंबर कांद्याला १८०० ते २२००  पर्यंत भाव मिळाला. मंचर, लासलगाव येथे एक नंबर कांद्याला २७५० पर्यंत बाजार मिळाला. नगर बाजार समितीचा बाजारभाव राज्यात अव्वल ठरला.
 
 भाव अजून वाढतील
बाहेरच्या राज्यातील कांद्याची आवक घटल्याने महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढत आहे. मध्यंतरी कांदा खराब झाला. आता साठवणूक केलेला कांदा विक्रीला येत आहे. लाल कांदा बाजारात येण्यास अजून वेळ आहे. त्यामुळे  बाजारभाव वाढू शकतील.
- अभय भिसे, सचिव, नगर बाजार समिती.
बातम्या आणखी आहेत...