आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेतूतील मुजोरीला राठोडांचा चाप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर सेतू कार्यालयातील अनागोंदी कारभाराची दखल घेत आमदार अनिल राठोड यांनी बुधवारी सेतूत जाऊन सेना स्टाईल आंदोलन करत आपल्या हाताने दाखल्यांचे वाटप केले. या आंदोलनामुळे सेतूच्या ठेकेदाराच्या मुजोरीला चांगलाच चाप बसला.दाखले वाटपात होणार्‍या दिरंगाईबद्दल तहसीलदार कैलास पवार यांना धारेवर धरत दोन दिवसांत दाखल्यांचे वाटप करण्याची सूचना राठोड यांनी केली.

शाळा व महाविद्यालय प्रवेशासाठी लागणार्‍या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून सेतू कार्यालयात पालक व विद्यार्थी गर्दी करत आहेत. अधिकार्‍यांची स्वाक्षरी न झाल्याने सेतूतून दाखले दिले जात नसताना एजंट मात्र पाचशे रुपयांत दाखला देण्याची हमी देऊन पैसे उकळतात. दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालकांना दररोज चकरा माराव्या लागत आहेत. याबाबत ‘दिव्य मराठी’ने सातत्याने आवाज उठवत सेतूतील अनागोंदीवर प्रकाश टाकला होता. ‘दीड हजार विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडली’ (24 जून) व ‘सेतूत होते एजंटांकडून विद्यार्थ्यांची लूट’ (25 जून) असे वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेऊन आमदार राठोड यांनी बुधवारी सेतू कार्यालयात येऊन सेना स्टाईल आंदोलन करत सेतूच्या कर्मचार्‍यांना धारेवर धरले. नंतर त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार चंद्रकांत नागवडे यांना धारेवर धरत तातडीने तहसीलदारांना बोलावून घेण्याच्या सूचना दिल्या. सुमारे अर्धातास राठोड यांनी विद्यार्थी व पालकांच्या दाखले वाटपाबाबत अडचणी समजून घेतल्या. तहसीलदार पवार येताच त्यांच्याकडे विचारणा करत तातडीने दाखले वाटण्याची सूचना दिली. पवार यांच्यासमवेत सेतू कार्यालयात येऊन राठोड यांनी आपल्या हाताने दाखल्यांचे वाटप केले. शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक विक्रम राठोड यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नगरसेवक विक्रम राठोड यांनी सेतू कार्यालयाच्या बाहेर येऊन अनेकांना दाखल्यांचे वाटप केले. राठोड यांनी दाखल्यांच्या वाटपाबाबत दूरध्वनीवरून उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरुडे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कानावर हा प्रकार घातला. नंतर तहसीलदार कैलास पवार यांच्याशी दाखल्यांच्या वाटपाबाबत चर्चा केली. यावेळी पवार म्हणाले, मंगळवारी प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत सेतूतील दाखले वाटपाबाबत बैठक झाली. दाखले मिळत नसल्याने संबंधित ठेकेदाराला प्रशासनाने नोटीस काढली आहे. त्याच्याकडे असलेली सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. ठेकेदाराविरुध्द गुन्हा दाखल दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पवार यांनी दिले.

एजंटगिरी बंद करा
४सेतूत दाखल्यांसाठी सर्वसामान्यांची लूट होते. जास्त पैसे घेऊन दाखले दिले जातात. सेतूतील एजंटगिरी तातडीने थांबवावी. महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी उद्याची शेवटची तारीख आहे. दाखले मिळाले नाहीत, तर प्रवेश कसा मिळेल? तहसीलदारांनी रात्रभर थांबून स्वाक्षर्‍या कराव्यात व गुरुवारी सर्वांना दाखल्यांचे वाटप करावे.’’
अनिल राठोड, आमदार.
विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या
४ दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याची प्रशासनाने तातडीने दखल घेतली पाहिजे. तीन-तीन महिने दाखले मिळत नाही, याला जबाबदार कोण? दाखल्यावाचून प्रवेश रखडणार नाहीत, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. विद्यार्थांच्या दाखल्यांना प्राधान्य द्यावे.’’
संभाजी कदम, शहरप्रमुख, शिवसेना