आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या कारभाराचे नगरकरांनी काढले वाभाडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - "शहरातील हजार ७०० खड्ड्यांनी हाडे झाली खिळखिळी' हे वृत्त "दिव्य मराठी'ने बुधवारी प्रसिध्द केले. विशेष म्हणजे "दिव्य सिटी' पानातील सर्व बातम्या नगरऐवजी "खड्ड्यांचे शहर' या डेटलाईनने प्रसिध्द करण्यात आल्या. दैनिक दिव्य मराठीने घेतलेल्या या रोखठोक भूमिकेचे नगरकरांसह जिल्ह्यातील नागरिकांनीही कौतुक केले. बुधवारी दिवसभर सोशल मीडियावर शहरातील खड्डयांची चर्चा सुरू होती. अनेकांनी महापालिकेच्या कारभारावर उपहासात्मक टीका केली. सामाजिक कार्यकर्ते अॅड. श्याम असावा यांनी तर लोकप्रतिनिधींच्या वतीने उपहासात्मक खुलासा सादर करून महापालिका कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले. खड्ड्यांमुळे शहरातील उद्योगधंद्यांची मोठ्या प्रमाणात भरभराट झाली होत असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली.
दैनिक दिव्य मराठीने नेहमीच नागरिकांचे प्रश्न मांडले आहेत. शहरातील खड्ड्यांचा प्रश्नही वेळोवेळी मांडला, परंतु महापालिका प्रशासन संबंधित लोकप्रतिनिधींना जाग आली नाही. "दिव्य मराठी'ने मात्र नागरिकांचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्याचे सोडले नाही. बुधवारच्या अंकात "दिव्य सिटी' पानावरील प्रत्येक बातमी नगरऐवजी "खड्डयांचे शहर' या डेटलाईनने केली. "दिव्य मराठी'चा हा अभिनव उपक्रम महापालिका प्रशासन संबंधित आजी-माजी लोकप्रतिनिधींसाठी मोठी चपराक ठरल्याची प्रतिक्रिया वाचकांनी दिली. हा प्रश्न अत्यंत वेगळ्या परिणामकारक पध्दतीने मांडल्याबद्दल नागरिकांनी दैनिक दिव्य मराठीला धन्यवादही दिले.

सोशल मीडियावरही दैनिक दिव्य मराठीच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक सुरू होते. नगरकरच नाही, तर जिल्हाभरातून उपक्रमाचे स्वागत झाले. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्या जशाचा तशा वाचकांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. उपनगरातील नागरिकांनाही खड्ड्यांचा मोठा त्रास होत असून त्यांनी या वृत्ताचे स्वागत केले.

खड्ड्यांचा प्रश्न योग्य पध्दतीने मांडला
^नगरशहरात निवडणूकीचा काहीच उपयोग नाही, सत्ताधारी प्रशासन यांना कधीच काही फरक पडत नाही. दैनिक दिव्य मराठीने ज्या पध्दतीने खड्डयांचा प्रश्न मांडला, तो कौतुकास्पद आहे.’’ गौरी रेखी, नगर.

खड्ड्यांचा प्रश्न गांभीर्याने घ्या...
^खड्ड्यांमुळे वेळेचे नियोजन चुकते. पाठीची दुखणीही वाढली. इतर शहरातून नगरमध्ये येणाऱ्यांसमोर वाईट प्रतिमा तयार होते. लोकप्रतिनिधींनी खड्ड्यांचा प्रश्न गांभीर्याने सोडवणे आवश्यक आहे.’’ दीपाली माळी, नगर.

चांदबिबीचा घोडा आडवा येतोय
^आम्हाला उड्डाणपूल,उद्योग, रस्ते अशी अनेक कामे करण्याची हौस आहे, पण ज्या चांदबिबीने ढासळलेल्या बुरूजाची एका रात्रीत दुरूस्ती केली, त्या राणीचा घोडा एकही काम होऊ देत नाही. दमात घेऊन म्हणतोय, माझ्या हक्काच्या खड्ड्यातील पाण्याशी तोडपाणी करायची नाही. खबरदार जर कुणी खड्डे बुजवले. हा घोडा आडवा आला नसता, तर खड्डे नक्कीच बुजवले असते...'' दत्तात्रय पुजारी, पारनेर.

आपली जबाबदारी ओळखावी
^दैनिक दिव्यमराठीने नगर शहरातील खड्ड्यांचा प्रश्न अभिनव पध्दतीने मांडून तो ऐरणीवर आणला आहे. नागरिकांप्रती महापालिकेची काही जबाबदारी आहे, याची जाणीव संबंधितांना राहिलेली नाही. किमान आतातरी अधिकारी पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करून शहर उपनगरांतील नागरिकांना चांगल्या रस्त्यांची सुविधा द्यावी.'' बी.के. कुलकर्णी, सावेडी.
बातम्या आणखी आहेत...