आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकरांनी उडवला खरेदीचा बार; ३० कोटींची उलाढाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दिवाळीच्या खरेदीसाठी शनिवारी झालेल्या गर्दीने उच्चांक मोडला. नगरकरांनी खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला. नगरच्या बाजारपेठेत दिवसभरात ३० कोटींची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीला बुधवारी वसुबारसेपासून प्रारंभ झाला. गेल्या आठ दिवसांपासून दिवाळीची तयारी सुरु होती. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने सणाचा उत्साह आेसंडून वहात आहे. शहरातील बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत. शुक्रवारी धनयत्रोदशीचा मुहूर्त साधत नगरकरांनी सुवर्णखरेदीचा आनंद लुटला. गेल्या दोन दिवसांत सराफ बाजारात सुमारे पाच ते सहा कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

दिवाळीतील मुख्य दिवस लक्ष्मीपूजनाचा असतो. लक्ष्मीपूजन रविवारी असल्याने शनिवारी बाजारात गर्दीने उच्चांक मोडल्याचे दिसत होते. लक्ष्मीपूजनासाठी लागणारे पूजेचे साहित्य, लक्ष्मीच्या मूर्ती, केरसुनी, विविध प्रकारची फळे, वह्या हे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची झुंबड उडाली होती. बाजारात शंभरपासून पाचशे रुपये किमतीच्या लक्ष्मीच्या मूर्ती उपलब्ध आहेत. केरसुणीची किंमत ३० ते ५० रुपये आहे.

एमआयडीसीतील कारखान्यांना शनिवारी सुटी असल्यामुळे कामगारांनी कुटुंबासह खरेदीचा आनंद घेतला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनही नागरिक खरेदीसाठी नगरला आले होते. माळीवाडा, कापडबाजार, तेलीखुंट, चितळे रस्ता, भिस्तबाग, प्रोफेसर कॉलनी, घासगल्ली, नवीपेठ, दिल्ली दरवाजा, सर्जेपुरा, मोचीगल्ली यासह उपनगरातील केडगाव, भिंगार, नागापूर या भागात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. गृहिणींसाठी साड्या, लहान मुलांसाठी रेडिमेड कपडे घेण्यासाठी गर्दी झाली होती. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, सोने-चांदी दागिने, वाहन अन्य खरेदीतून एका दिवसात सुमारे ३० कोटींची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. येत्या दोन-तीन दिवसांतही बाजारपेठेत चैतन्य असेल. व्यापारी वर्गात खुशीचे वातावरण आहे.
दिवाळीनिमित्त शनिवारी बाजारपेठेत खरेदीसाठी अशी गर्दी उसळली होती. छायाचित्र : मंदार साबळे

खड्ड्यांनी केले बेजार
गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे नगर शहरातील विविध रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना या खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर बेशिस्तपणे रिक्षा लावण्यात आल्याने, तसेच रस्त्यांवर हातगाड्या, दुचाकी चारचाकी वाहने लावल्याने अमरधाम, कापडबाजार, दिल्ली दरवाजा, सर्जेपुरा, दाळमंडई या भागात अनेकदा वाहतूक कोंडी झाली. अनेकांनी वाहतूक कोंडीचा त्रास नको, म्हणून उपनगरांमध्येच दिवाळीची खरेदी केली. खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे.

झेंडूची फुले स्वस्त
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराचे प्रवेशद्वार, तसेच वाहनांच्या सजावटीसाठी, तसेच लक्ष्मीपूजनसाठी झेंडूची फुले लागतात. यंदा झेंडूच्या फुलांची आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत. फुलांचे आगार असलेल्या पारनेर तालुक्यातून सकाळपासून फुलांची आवक सुरु होती. मात्र, भाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. अवघेे २० रुपये किलो दराने शनिवारी झेंडूच्या फुलांची विक्री झाली. काही ठिकाणी पंधरा रुपये किलो दराने विक्री सुरू होती. शेवंती अन्य फुलांचेही भाव कमी झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...