आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन मंडळांकडून "डीजे'मुक्तीला खोडा, सेना शहरप्रमुखासह १३ जणांविरुद्ध गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - न्यायालयाने दिलेले आदेश, पोलिसांनी केलेले डीजेमुक्त मिरवणुकीचे आवाहन धुडकावून लावत शहरातील तीन मंडळांनी यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतही डीजेचा दणदणाट केलाच. हृदयाचे ठोके वाढवणारे संगीत, कर्णकर्कश डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई अन् मद्यधुंद कार्यकर्ते, त्यामुळे रेंगाळलेली मिरवणूक, राजकीय घोषणाबाजी, अशा आवेशपूर्ण वातावरणात सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाला निरोप दिला. सोमवारी पोलिसांनी डीजेचालक मंडळांच्या अध्यक्षांवर गुन्हे नोंदवले. जिल्ह्यात एकूण १६ गुन्हे नोंदवण्यात आले असून ७१ जणांना आरोपी करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते रविवारी (२७ सप्टेंबर) सकाळी शहराचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या श्रीविशाल गणेशाची पूजा करण्यात आली. नंतर गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाली. नगरच्या युवक युवतींचे ढोल-ताशाचे पथक मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते. हजारो गणेश भक्त मिरवणुकीत सहभागी झाले. बंगाल चौकी, भिंगारवाला चौक, नगर अर्बन चौक, नवीपेठ येथे नागरिकांनी विशाल गणपती रथाचे स्वागत केले. चौकाचौकात महिलांनी रांगोळ्या काढल्या. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत १२ मंडळे सहभागी झाली. श्रीविशाल गणेश मंडळ अग्रभागी, तर त्यापाठोपाठ इतर गणेश मंडळे होती.

नाकात नथ, डोक्यावर फेटे आणि हातात लेझीम घेतलेल्या स्त्रिया, ढोल, ढोलताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरया, असा जयघोष करीत आणि पुढल्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. मानाच्या विशाल गणपतीने जागोजागी भक्तांकडून आरतीचा मान घेत आवडत्या मोदकाचा नैवेद्य स्वीकारत रथातून थाटात भक्तांचा निरोप घेतला, तर छोट्या बाळांना बाप्पाच्या चरणी ठेवताना महिलांची गडबड चालली होती. यावर्षी सगळीकडे पारंपरिक वाद्यांनी मिरवणुकीत स्थान मिळवले. सायंकाळी नंतर तरुणाईचा उत्साह शिगेला पोचला. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा आबालवृद्धांनी महिलांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती.

मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत सहभागी झालेले नगरी ढोल, ताशा हलगी पथके हे मुख्य आकर्षण ठरले. लेझीम झांज पथकही मिरवणुकीत सहभागी झाले. दांडपट्टा, तलवारबाजीची कलाही सादर झाली. मिरवणूक दिल्लीगेट वेशीत आल्यावर भाविकांनी गुलालाची उधळण गणरायाचा जयघोष केला. घरगुती गणरायांचे विसर्जन करण्यासाठी मनपाने बाळाजीबुवा बारव येथे कृत्रिम हौदाची व्यवस्था केली होती.

धनगरीगजे नृत्य आकर्षण
लोककलेचा भाग असणारे धनगरी गजे नृत्य यंदाच्या मिरवणुकीत आकर्षण ठरले. तरुणाईला लाजवेल अशा जोशात ढोल, पिपाणीच्या तालावर अंगात कपचे, हातात गोंडे घातलेल्या वृद्धांनी धरलेला लयबद्ध ताल... म्हणजे गजे नृत्य बघ्याचे पाय खिळवत होते. रंगीबेरंगी रांगोळीच्या पायघड्या मानाच्या गणपती साठी सजवण्यात आल्या होत्या. पारंपरिक वाद्यांमध्ये शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीची विसर्जन मिरवणूक पार पडली. लोकाच्या गर्दीतून पारंपरिक वाद्याचे होणारे कौतुक सुखावह होते. इतर मानाच्या मंडळांंनी ही मल्हार, महादेव अशा वेगवेगळ्या रुपात असणाऱ्या गणरायाला आकर्षक सजावट करून बँड, ढोलाच्या तालावर निरोप दिला.

पर्यावरण पूरक विसर्जन
यंदा शहरातील अनेक घरांमध्ये शाडूच्या मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आलेली होती. काही सोसायटीतील लोकांनी मोठ्या पिंपात एकत्रितपणे सोसायटीच्या अावारातच या बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन केले. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून निर्माल्य झाडाच्या मुळाजनीक टाकण्यात आले. नेटीजन्सनी "आभाळ भरले होते तू येताना.. आता डोळे भरून आले तुला निरोप देताना', असे म्हणत सोशल मीडियावर गणरायाला निरोप दिला. यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत हाेते. बाप्पाच्या भक्तांमध्ये झालेली ही विधायक बदलाची जाणीव सुखद होती.

शांताबाईचा दणदणाट
राजकीय व्यक्तींशी निगडित तीन मंडळांना नोटिसा बजावूनही त्यांनी डीजे वाजवलेच. डीजेच्या आवाजावर अखेरपर्यंत कोणतेही निर्बंध नव्हते. चिंचोळ्या गल्लीबोळात धोकादायक इमारतींच्या परिसरातही ध्वनिमर्यादेच्या नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे मिरवणूक मार्ग दणाणला. बेबी डॉल सोने दी, मै हूँ डॉन, शिट्टी वाजली, लुंगी डान्स, पप्पी दे पारूला यांसह शिवसेनेचे प्रचारगीत इतर गाण्यांनी विसर्जन मिरवणूक दणाणून गेली. शांताबाई गाण्याने, तर कहरच केला. या गाण्यावर तरुणांनी कार्यकर्त्यांनी हिडीस हावभाव करत ताल धरला.

राजकीय स्टंटबाजीचा पोपट
राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या तीन मंडळांनी कोर्टाचे आदेश धुडकावत डीजेचा दणदणाट केला. तणाव निर्माण होऊ नये, म्हणून पोलिस ध्वनीमर्यादा पाळण्याच्या सूचना देत होते. मिरवणूक संपताच पोलिसांनी डीजे सिस्टिमचा ताबा घेतला. हा लवाजमा घेऊन पोलिस निघाले असता, एक बडा नेता त्यांना आडवा आला. त्याने पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. रास्ता रोकोची धमकीही दिली. मात्र, पोलिसांनी नेत्यासोबत असलेले कार्यकर्ते बाजूला काढले. एकटे पडल्याचे लक्षात आल्यामुळे नेत्यालाही बाजूला व्हावे लागले. स्टंटबाजी फोल ठरल्यामुळे अखेर या नेत्याला काढता पाय घेतला.

महिलांची लक्षणीय उपस्थिती
यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेमुक्तीचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे पारंपरिक वाद्यांच्या तालावर नेत्रदीपक मिरवणूक निघेल, या अपेक्षेने शहर, उपनगरातील युवती महिलांनी सायंकाळी मोठ्या संख्येने मिरवणुकीला हजेरी लावली. रस्त्याच्या दुतर्फा युवती, महिला आबालवृद्ध मिरवणूक पाहण्यासाठी थांबले होते. ढोल, ताशे, पारंपरिक वेषभूषा केलेल्या मंडळांची मिरवणूक सर्वांनी पाहिली. मात्र, उशिराने नवीपेठेत तीन मंडळांचे डीजे दाखल झाले. डीजेच्या तालावर मद्यधुंद झालेल्या तरुणाचे हिडीस नृत्य पाहण्यापेक्षा युवती महिलांनी मिरवणुकीतून निघून जाणेच पसंत केले.

ड्राय डे चा नियम धाब्यावर
गणेशविसर्जन मिरवणुकीच्या दिवशी ड्राय डे घोषित केलेला होता, तरीही राजकीय नेतेमंडळींनी गणेश भक्तांसाठी खास व्यवस्था केलेली होती. त्यामुळे अनेकांनी नशेतच गणरायांना निरोप दिला. किरकोळ बाचाबाचीचे प्रकारही घडले. त्यात पोलिसांनी हस्तक्षेप केला. पण, राजकीय नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.