कुकाणे- ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने 20 मेगावॅट क्षमतेचा सहवीजनिर्मितीचा प्रकल्प हाती घेतल्याने कारखान्याची टर्बाइन (बॉयलर) क्षमता वाढणार आहे. त्यामुळे उसाला जास्त भाव देता येईल. शेतक-यांची जाण असणारे सरकार आले पाहिजे, ते शेतकरी हिताचे निर्णय घेते. शरद पवार हेच शेतक-यांचे नेते आहेत. त्यांच्या पाठीमागे
आपण खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहान माजी आमदार नरेंद्र घुले यांनी केले.
विजयादशमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचा 41 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ झाला. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग होते. व्यासपीठावर आमदार चंद्रशेखर घुले, ऊसतोड कामगार नेते गहिनीनाथ थोरे, अॅड. देसाई देशमुख, काशीनाथ नवले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उषाताई अशोक मोटकर यांच्या हस्ते बॉयलरची विधिवत पूजा केली.
माजी आमदार घुले म्हणाले, शेतक-यांची जाण असणार नेता हवा. आज केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतमालाला भाव नाही. शेतकरी धार्जिणे सरकार असेल, तरच आपले भले आहे. आपल्या विचाराचे सरकार आले पाहिजे. या वेळी पांडुरंग अभंग, गहिनीनाथ थोरे, अॅड. देसाई देशमुख यांची भाषणे झाले. या कार्यक्रमास शिवाजीराव देशमुख, राम पाऊलबुधे, गणेश गव्हाणे, ज्ञानेश्वरचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे यांच्यासह कामगार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.