आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांच्या पिळवणूकप्रकरणी डॉक्टरांचे खुलासे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्हा रुग्णालयात रुग्णांना बाहेरून उपचार साहित्य विकत आणायला सांगितल्याप्रकरणी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रभास पाटील व डॉ. सुनील पोखर्णा यांनी खुलासे सादर केले आहेत. रुग्णाचा जबाब आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालयात रुग्णांची पिळवणूक होत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणले होते. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी अधिकार्‍यांची नेमणूक करून संबंधित दोन्ही वैद्यकीय अधिकार्‍यांना खुलासे सादर करण्याचे आदेश दिले होते. अस्थिरोग कक्षात ऑपरेशनसाठी दाखल झालेल्या रुग्णांना बाहेरून साहित्य आणण्यास सांगितले जात असल्याने सहा ते सात हजारांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. वास्तविक रुग्ण कल्याण समिती व इतर अनुदानातून स्थानिक पातळीवर हे साहित्य खरेदी करता येते. परंतु ढिसाळ कारभारामुळे रुग्णांची आर्थिक पिळवणूक होते. डॉ. पाटील व डॉ. पोखर्णा यांचे खुलासे आले आहेत. परंतु बाहेरून उपचार साहित्य घेऊन येणार्‍या रुग्णाचा जबाब मिळालेला नाही.

मागणीपत्राचे काय झाले?
औषधे, तसेच ऑपरेशनसाठी आवश्यक साहित्य रुग्णालयात उपलब्ध नसते. अशावेळी चिकित्सा कक्षाकडून (ओटी) औषध भांडारकडे मागणीपत्र पाठवावे लागते. हे पत्र मिळाल्यानंतर औषध निर्माण अधिकारी हे साहित्य स्थानिक पातळीवर खरेदी करून देतो. परंतु ज्या रुग्णाला बाहेरून रॉड खरेदी करायला सांगितला, त्याचे उपचार साहित्याचे मागणीपत्र औषध भांडाराकडे पाठवले नव्हते.

काय आहे खुलाशात
तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर यांनी दारिद्रय़रेषेखालील रुग्णांना मोफत औषधे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. दारिद्रय़रेषेवरील रुग्णांच्या संमतीने बाहेरून औषध व साहित्य आणण्याची अनुमती देण्यासही सांगितले होते. संबंधित रुग्णाने उपचार साहित्य स्वखर्चाने आणणार असल्याचे लेखी दिले असल्याचे खुलाशात म्हटले आहे, अशी माहिती डॉ. पी. एस. कांबळे यांनी दिली.