आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिव्हिलमधील डॉक्टर स्वत:च्या रुग्णालयांत व्यग्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-जिल्हा रुग्णालयातील अस्थिरोग विभागात वर्षानुवष्रे ठाण मांडून बसलेले डॉ. सुनील पोखरणा व डॉ. प्रभास पाटील यांची स्वत:ची खासगी रुग्णालये शहरात आहेत. मुंबई शुर्शुषागृह नोंदणी अधिनियम धाब्यावर बसवून या डॉक्टरांच्या व्यवस्थापनाखाली खासगी रुग्णालये सुरू आहेत. डॉक्टरांच्या या खासगी रुग्णालयांमुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण वेठीला धरले जात आहे.
मुंबई शुर्शुषागृह नोंदणी 1949च्या अधिनियमात शासनाने सन 2006 मध्ये सुधारणा केली. या सुधारित अधिनियमानुसार शासकीय वैद्यकीय अधिकार्‍याला स्वत:च्या मालकीचे किंवा त्याच्या व्यवस्थापनाखाली खासगी हॉस्पिटल चालवता येत नाही. या नियमाचे उल्लंघन करणार्‍यांना दोषसिद्धीनंतर सहा महिने कारावास किंवा दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड यापैकी एक किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. सुधारित अधिनियम सुस्पष्ट असतानाही येथील जिल्हा रुग्णालयातील डॉ. पोखरणा व डॉ. पाटील राजरोसपणे खासगी हॉस्पिटलचे व्यवस्थापन बघत आहेत. महापालिका क्षेत्रातील अशा वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित महापालिका आरोग्य अधिकार्‍याला आहेत. मात्र, आरोग्याधिकार्‍यांकडून कारवाई झाल्याचे एकही उदाहरण नाही.
डॉ. पोखरणा यांच्याविषयी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. सी. आठवले यांनी थेट आरोग्य सचिव व संचालकांकडे तक्रारी केल्या होत्या. एप्रिल व मे 2012 मध्ये या तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारीं नंतर कारवाई करण्याऐवजी त्यांना वर्ग-दोनमधून वर्ग एक पदाची बढती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. डॉ. पोखरणा गेल्या नऊ वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत आहेत.
पोखरणा यांच्या पत्नीच्या नावे नोंदणी असलेले पोखरणा हॉस्पिटल रामचंद्र खुंटावर आहे. ‘आर्थोपेडिक व अँक्सिडेंट सेंटर’ असा उल्लेख असलेल्या फलकावर डॉ. पोखरणा व त्यांच्या पत्नीचे नाव आहे. त्यांची पत्नी डॉ. रश्मी पोखरणा या एमबीबीएस व डिप्लोमा इन क्लिनिक पॅथॉलॉजी पदविकाधारक आहे. मात्र, त्यांचे हॉस्पिटल ऑर्थोपडिक उपचार व शस्त्रक्रियेसाठीच्या अद्ययावत सुविधांनी युक्त आहे. डॉ. प्रभास यांची पत्नी डॉ. वृषाली यांच्या नावे लोकमान्य अँक्सिडेंट हॉस्पिटल होते. सन 2013 मध्ये नावात बदल करून साकार हॉस्पिटल, ऑर्थोपेडिक अँड मॅटर्निटी होम या नावाने नोंदणी करण्यात आली. बालिकार्शम रस्त्यावर हे हॉस्पिटल आहे. कागदोपत्री पत्नीच्या नावावर असलेल्या या हॉस्पिटलचे व्यवस्थापन डॉ. प्रभास पाटील पाहतात. डॉ. वृषाली पाटील या महापालिकेच्या डॉ. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी आहेत.
रुग्णालय व पॅथॉलॉजी वेगळ्या नावाने
रामचंद्र खुंट परिसरातील पोखरणा हॉस्पिटल डॉ. रश्मी सुनील पोखरणा यांच्या नावे मनपा प्रशासनाकडे नोंदणीकृत आहे. मात्र, लक्ष्मी कारंजा येथील पोखरणा पॅथॉलॉजिकल लॅब डॉ. रश्मी रुपचंद संकलेचा यांच्या नावाने नोंदणी केलेली आहे. सासरच्या नावे हॉस्पिटल व माहेरच्या नावे पॅथोलॉजी असा प्रकार आहे. यासंदर्भातही कारवाई करण्याची मागणी मनपाच्या आरोग्य अधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
कारवाईचा धाक नसल्याने अस्थिरोग विभागातील डॉक्टरांची मनमानी सातत्याने वाढली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांचे पाठबळ असल्याने स्थानिक अधिकार्‍यांचे आदेश ते पाळत नाहीत. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून केली आहे. त्यानुसार कारवाई न झाल्यास संबंधित डॉक्टर व त्यांना पाठीशी घालणार्‍या यंत्रणेला न्यायालयात खेचू्.’’ शाकीर शेख, माहिती अधिकार कार्यकर्ते.
नाहीतर आंदोलन
नियुक्तीच्या ठिकाणी डॉ. पोखरणा कधीतरी अवतरतात. कधीमधी आल्यानंतरही रुग्णांना त्यांच्या खासगी रूग्णालयात पळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत आहेत. प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना नियमितपणे ग्रामीण रुग्णालयात पाठवावे; अन्यथा आंदोलन करू. दत्तात्रेय सदाफुले, सदस्य, जिल्हा परिषद