आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य : संपामुळे रुग्णसेवेसाठी खासगी डॉक्टरांची मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील सुमारे 325 शासकीय वैद्यकीय अधिकारी विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून (1 जुलै) राज्यव्यापी संपावर गेले आहेत. सकाळी जिल्हा रुग्णालयात निदर्शने करत त्यांनी काम थांबवले. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशिक्षणार्थी, तसेच खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात आली आहे. तथापि, रुग्णांची काही ठिकाणी गैरसोय झाली.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेने विविध मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारला आहे. संघटनेने सकाळी जिल्हा रुग्णालयात निदर्शने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. प्रमोद म्हस्के, सचिव अनिल ससाणे, डॉ. माधव भोर, डॉ. रवींद्र गोर्डे, डॉ. धनंजय खंडागळे आदी उपस्थित होते.

आरोग्य ही अत्यावश्यक सेवा आहे. जिल्ह्यात दररोज शेकडो रुग्ण जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांत दाखल होतात. वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. संपाचा परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी पी. डी. गांडाळ व प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी. एस. कांबळे यांनी परस्पर समन्वय ठेवून उपाययोजना केल्या आहेत.

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तसेच ग्रामीण रुग्णालयातील 120 स्थायी वैद्यकीय अधिकारी, 30 अस्थायी व 2 बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी संपावर गेले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेले 103 स्थायी वैद्यकीय अधिकारी, 61 अस्थायी व 14 बंधपत्रित वैद्यकीय अधिका-यांनीही संपात सहभागी झाले आहेत. आरोग्य सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड (आयपीएचएस) अंतर्गत कार्यरत असलेले कंत्राटी 1 सर्जन, 1 फिजिशियन, बाल आरोग्य स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 12 वैद्यकीय अधिका-यांची मदत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयाकडून प्रशिक्षणार्थी व इतर 90 खासगी डॉक्टरांची मदत घेतली आहे.

वैद्यकीय अधिका-यांच्या संपामुळे शवविच्छेदनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. कांबळे यांनी वैद्यकीय संघटनांना शवविच्छेदन करण्याची विनंती केली आहे. पद्मश्री विखे मेडिकल फाउंडेशनची मदत घेण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत मनुष्यबळ देण्याचेही आश्वासन या संस्थेने दिल्याचे डॉ. कांबळे यांनी सांगितले.

गरोदर मातांची गैरसोय होऊ नये, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. जिल्हा रुग्णालयात येणा-या गरोदर मातांवर संबंधित खासगी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरळीत चालू असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला. तथापि, संप आणखी काही दिवस सुरू राहिल्यास रुग्णांची गैरसोय होणार आहे.

इतर संस्थांची मदत - संपाच्या कालावधीत विखे मेडिकल फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशनकडून मदतीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मंगळवारी वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू राहिली. शवविच्छेदन व आपत्कालीन सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी वैद्यकीय अधिका-यांच्या संघटनांना विनंती केली होती.’’ डॉ. पी. एस. कांबळे, प्रभारी, जिल्हा शल्यचिकित्सक.

तात्पुरते वैद्यकीय अधिकारी
- प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हा रुग्णालयाकडून काही प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मदत घेण्यात आली. जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून 90 डॉक्टरांवर तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे.’’ डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा आरोग्याधिकारी.

आजपासून शवविच्छेदनही नाही
- प्रभारी शल्यचिकित्सकांच्या विनंतीवरून आम्ही शवविच्छेदन केले. परंतु बुधवारपासून (2 जुलै) शवविच्छेदन व न्यायवैद्यक तपासणीचे काम बंद करणार आहोत. जनतेची माफी मागून आम्ही आंदोलन सुरू ठेवले आहे.’’ डॉ. प्रमोद म्हस्के, जिल्हाध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी संघटना.
फोटो - शासकीय वैद्यकीय अधिकाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी निदर्शने करीत संप सुरु केला. छाया : कल्पक हतवळणे