आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 टक्के शस्त्रक्रिया रखडल्या, 240 डॉक्टर संपात सहभागी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- निवासी डॉक्टर हेमंत चिमोटे आणि सहका-यांना झालेल्या मारहाणीनंतर निवासी डॉक्टरांच्या संघटनेने कारवाई केल्याखेरीज कामावर येणार नाही, अशी भूमिका घेऊन बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचे गंभीर परिणाम रुग्णांना भोगावे लागत आहेत. नेहमीच्या तुलनेत बुधवारी 50 टक्के शस्त्रक्रिया रखडल्या. नेहमी रुग्णांची धावपळ असलेल्या अपघात विभागासमोर आज शुकशुकाट होता.
डॉक्टरांनी संप पुकारल्याने शस्त्रक्रिया निम्म्यावर आल्या आहेत. बाह्यरुग्ण विभागावर मात्र संपाचा फारसा फरक पडला नाही, असे घाटीचे अधीक्षक डॉ. अविनाश मगरे यांनी सांगितले. डॉ. मगरे म्हणाले, तातडीच्या शस्त्रक्रिया आम्ही केल्या आहेत. शिवाय महाविद्यालयातील 13 प्राध्यापक डॉक्टरांना रुग्णालयात पाचारण केले आहे. यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात सोय झाली. घाटीमध्ये 240 निवासी डॉक्टर असून त्यांनी पुकारलेल्या संपामुळे पूर्वनियोजित 40 शस्त्रक्रिया मंगळवारी रद्द करण्यात आल्या होत्या. अलका बेहरे या रुग्णाच्या नातेवाइकांनी केलेल्या मारहाणीनंतर डॉक्टरांनी हे प्रकरण सामोपचाराने घ्यावे. रुग्णाच्या जिवाला धोका असल्याच्या भीतीमुळे तसेच मुलगी गमावल्याच्या तणावात हा प्रकार घडला, ही परिस्थिती डॉक्टरांनी समजावून घ्यायला हवी. तसेच मारहाण केलेल्यांनी माफी मागितल्यानंतर संप मागे घ्यायला हवा. दरम्यान, पोलिस सीसीटीव्ही फुटेजवरून दोषींवर कारवाई करणार आहेत, यासाठी थोडा वेळा द्यावा लागतो, असे डॉ. अविनाश मगरे म्हणाले. मंगळवारी निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाइकांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ "मार्ड'ने संप पुकारल्यामुळे बुधवारी रुग्णांची हेळसांड झाली. दुसऱ्या छायाचित्रात कर्मचा-यांअभावी रुग्णाच्या नातेवाइकांना स्ट्रेचर ओढावे लागले.