आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध दाखल्यांसाठी जास्त फी आकारणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड - रहिवासी दाखल्यासाठी ग्रामस्थांना तब्बल 25 रुपये मोजण्याची वेळ आली आहे. दाखले ऑनलाइन झाल्याने अशी फी सरकारतर्फेच आकारण्याच्या सूचना असल्याचे जामखेड ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात येत आहे. अशीच फी ग्रामपंचायतीमार्फत आकारली जात असल्याने सर्वसामान्य गरीब ग्रामस्थांना मोठा भार सहन करावा लागत आहे.

ग्रामपंचायतीमार्फत जनतेला देण्यात येणारे विविध प्रकारचे दाखले, नोंदी, फेरफार, उतारे, ना हरकत दाखले याची फी मोठय़ा प्रमाणात आकारली जात आहे. असे दाखले देताना त्या दाखल्यावर संबंधित व्यक्तीचा फोटो प्रिंट करूनच ऑनलाइन पद्धतीने दाखले देण्यात येत आहेत. असेच दाखले विविध बँका स्वीकारत असून अन्य प्रकारचे बिगर फोटो प्रिंटचे दाखले स्वीकारले जात नसल्याने असे फोटो प्रिंट दाखले घेतल्याशिवाय ग्रामस्थांना पर्याय उरलेला नाही.

ऑनलाइन पद्धत सुरू झाल्यानंतर रहिवासी दाखल्यासाठी 25 रुपये, उतार्‍यासाठी 10 रुपये, व्यवसाय दाखल्यासाठी 10 रुपये, ग्रामपंचायतीचे ना हरकत दाखल्यासाठी 35 रुपये, फेरफारसाठी 35 रुपये, खरेदी केलेल्या जागेची ग्रामपंचायतीत नोंद करण्यासाठी खरेदीमूल्याच्या 1 टक्के फी नोंदीसाठी ग्रामपंचायतीकडून आकारली जात आहे. या ग्रामपंचायतीच्या विविध फी आकारामुळे मात्र, सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

यापूर्वी हे दाखले, उतारे मोफतच दिले जात होते. खरेदी नोंदीलाही पैसे देण्याची गरज नसायची. मात्र, ऑनलाइन पद्धतीने लोकांच्या माथी भुर्दंड पडत आहे. ग्रामपंचायतीतर्फे देण्यात येणारे दाखले व उतारे ग्रामस्थांना विविध कामांसाठी लागणारे असून हे दाखले सवलतीच्या दरात कमी खर्चात मिळणे गरजेचे आहे. तशी मागणी करण्यात येत आहे.

जनतेला नाहक भुर्दंड
ऑनलाइन पद्धतीचे कारण पुढे करून ग्रामपंचायतीतर्फे देण्यात येणार्‍या विविध दाखल्यांसाठी जादा पैसे आकारण्याचा प्रकार सामान्य जनतेला नाहक भुर्दंड आहे. ग्रामपंचायतीने हा प्रकार त्वरित बंद केला पाहिजे.’’ संजय कोठारी, सामाजिक कार्यकर्ते.

नियमानुसार आकारणी
राज्य सरकारच्या आदेशानुसारच दाखल्यांसाठी फी आकारली जात आहे. रहिवासी दाखल्यासाठी 22 रुपये 50 पैसे आकारण्याचे आदेश आहेत. परंतु सुट्या पैशांअभावी 25 रुपये आकारले जात आहेत.’’ प्रा. कैलास माने, सरपंच, जामखेड.

ऑनलाइन पद्धतीमुळे दाखल्यांचे शुल्क वाढले
ऑनलाइन पद्धतीमुळे विविध दाखल्यांची फी वाढली आहे. ही फी कमी करण्याच्या सूचना आहेत. रहिवासी दाखला 22 रुपये 50 पैशांऐवजी 10 रुपये फी आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या असून याची त्वरित अंमलबजावणी करू. ’’ देविदास बचुटे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जामखेड.