आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केकताई दुहेरी हत्याकांड प्रकरणी सेवेकऱ्याचा शोध, नागरिकांना संशयिताची माहिती देण्याचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पिंपळगावमाळवी वनक्षेत्रात अतिक्रमण करून बांधलेल्या हिंगलाज माता (केकताई देवी) मंदिराच्या आवारात झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा अद्यापही उलगडा झालेला नाही. पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी केले आहे. पोलिसांना आश्रमातील एका सेवेकऱ्याचाही शोध आहे. या सेवेकऱ्याकडून ठोस माहिती मिळेल, असा पोलिसांचा कयास आहे. संशयित आरोपीची माहिती देणाऱ्यास पंधरा हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण हे करत आहेत.
 
केकताई परिसरात कुटी बांधून राहणाऱ्या तेथील पूजाअर्चा गोवर्धन गोशाळा चालवणाऱ्या सुदाम नामदेव बांगर ऊर्फ योगी सूरजनाथ महाराज (५०) त्यांचे भक्त असलेल्या बाबासाहेब बाबुराव कराळे (६०) यांचे मृतदेह गुरुवारी दुपारी जळालेल्या अवस्थेत आढळून आले. बुधवारी रात्री त्यांचा खून केल्याचा संशय आहे. दोघांचेही खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे मृतदेह जाळून टाकण्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.
 
गुरुवारी सकाळी मंदिरात आलेल्या परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांना वडगाव गुप्ता येथील मच्छिंद्र बबन बांगर यांनी घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरपासून जवळच पिंपळगाव माळवी वनक्षेत्रात हे देवीचे मंदिर अाहे. तेथे गेल्या १०-१२ वर्षांपासून बांगर यांचे वास्तव्य होते. पूर्वी छोटेखानी असलेले हे मंदिर मोठ्या स्वरूपात बांधण्यात आले. आवारातही काही ठिकाणी पक्के बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. मंदिराच्या मागील बाजूस धुनी पेटवण्यासाठी एक पत्र्याची खोली बांधलेली आहे. या खोलीत धुनीजवळच सुदाम बांगर यांचा पूर्ण जळालेल्या अवस्थेत, तर या खोलीबाहेर बाबासाहेब कराळे यांचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यात दगड घालून हा खून करून मग मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.
 
पोलिसांना हवेत धागेदोरे
बांगरमहाराजांसोबतचा एक सेवेकरी गुरुवारपासून बेपत्ता आहे. त्याच्याविषयी कोणाला अधिक काही माहिती नाही. त्यामुळे त्याच्या बेपत्ता होण्याचे कारण गूढ झाले आहे. हा सेवेकरी सापडला, तर खुनाचे कारण अथवा काही धागेदोरे सापडू शकतात. त्यामुळे पोलिसांनी या सेवेकऱ्याचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यादृष्टीने नागरिकांनाही आवाहन करण्यात आले आहे. या सेवेकऱ्याबद्दल कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
 

पंधरा हजारांचे बक्षीस
गेल्या१५ दिवसांत केकताई मंदिरात बांगर महाराजांच्या दर्शनाला भाविक आले होते. यापैकी कोणी बाबांसोबत फोटो काढल्याची शक्यता आहे. हे छायाचित्र एमअायडीसी पाेलिसांना पाठवण्याचे आवाहन करण्यात अाले आहे. सहायक निरीक्षक विनोद चव्हाण (९० ११ ०९० ९७५) यांना पाठवावेत. विशेषत्वाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाबांसोबत काढलेल्या फोटोमध्ये त्यांचा सेवेकरी सोबत आहे. ज्यांनी असे फोटो काढले, त्यांनी ते पोलिसांना पाठवावेत. त्यांचे नाव गुप्त ठेवून १५ हजारांचे बक्षीस दिले जाईल.
बातम्या आणखी आहेत...