शेवगाव- आखेगाव व जुना सालवडगाव रस्त्याच्या मध्यभागी निर्जन ठिकाणी रविवारी दोघांची हत्या झाली. या घटनेतील अन्य एकजण अत्यवस्थ आहे. त्यास नगरला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सोमवारी सकाळी फिरायला जाणाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. दीपक रामनाथ गोर्डे (३५, धनगरगल्ली, शेवगाव) व मंगल अनिल अळकुटे (३२, दहिगावने, ता. शेवगाव) अशी मृतांची नावे आहेत. बाळासाहेब रमेश केसभट (२८, श्रीराम कॉलनी, शेवगाव) हा गंभीर जखमी झाला. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे.
गेल्या महिन्यात १७ जूनला शहरातील विद्यानगर परिसरात माजी सैनिक अप्पासाहेब हरवणे यांच्यासह कुटुंबातील चौघांची हत्या झाली. त्यातील तीन आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत, तर दोन आरोपी फरार आहेत. या घटनेला महिना होत नाही, तोच पुन्हा दुहेरी हत्याकांडाचा प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली. आखेगाव रस्त्यावर सकाळच्या वेळी ज्येष्ठ नागरिक, तरुण व महिला फिरायला जातात. रस्त्यापासून १०० मीटरवर एक महिला व दोन पुरुष पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले.
शेवगावचे पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे व पथक लगेच घटनास्थळी आले. त्यांनी खासगी वाहनातून जखमी बाळू यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नगरला हलवण्यात आले. गोर्डे व अळकुटे यांचे मृतदेह शवचिकित्सेसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळी निरोध, बिस्किटांचा पुडा, स्कार्प, तीन मोबाइल हँडसेट, दारुच्या रिकाम्या बाटल्या, मोटारसायकल आढळली. मृत अळकुटे हिची बहिण अलका एकनाथ धनवडे (दहिगावने, ता. शेवगाव) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघेही मित्र
मृत दीपक गोर्डे हा वाहनचालक म्हणून काम करायचा, तर जखमी अवस्थेत असलेला बाळासाहेब केसभट हा गवंडी काम करायचा. हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते, तर मृत मंगल विवाहित महिला होती. रविवारी सायंकाळी त्यांना एके ठिकाणी स्वयंपाकाची ऑर्डर मिळालेली होती, अशी माहिती समोर आली आहे. आणखी माहिती पोलिस घेत आहेत.
अनैतिक संबंध
प्रथमदर्शनी हे दुहेरी हत्याकांड म्हणजे आपापसांतील भांडणातून घडलेला प्रकार असल्याचा पोलिसांचा संशय आहे. घटनास्थळी एक निरोध सापडल्यामुळे अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचाही पोलिसांचा अंदाज आहे. जड व तीक्ष्ण वस्तूने मारल्यामुळे हत्या झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, ज्या हत्याराने हत्या केली ते घटनास्थळी मिळालेले नाही.