आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद: शिक्षक नियुक्तीत भेदभाव केल्याची भावना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा परिषदेतील प्रत्येक पदस्थापना, बदल्या या प्रक्रियेत गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. हीच परंपरा शनिवारी शिक्षण विभागामार्फत सीईटीधारक प्रतीक्षेतील पात्र शिक्षकांना नियुक्ती देताना कायम राखली आहे. श्रीगोंदे तालुक्याला वेगळा न्याय ऐनवेळी शेवटच्या टप्प्यात आठ शिक्षकांना नियुक्त्या दिल्याने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे. पण शिक्षणाधिकाऱ्यांचा मोबाइल ‘स्वीच ऑफ’ असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सीईटी उत्तीर्ण झालेले पात्र शिक्षक २०१० पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. जिल्ह्यात शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने या जागेवर आंतरजिल्हा बदल्या करायच्या की, पात्र प्रतीक्षेतील शिक्षकांना नियुक्ती द्यायची असा संभ्रम होता. "दिव्य मराठी'ने वारंवार पात्र शिक्षकांवर अन्याय होत असल्याकडे लक्ष वेधले. याला यश येऊन शिक्षकांना नियुक्त्या देण्याचा दिवस शनिवारी उजाडला. जिल्हा परिषदेत पात्र शिक्षकांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया राबवली. पहिल्या टप्प्यात ९० शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या. पण या नियुक्त्या देताना मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. हा घोळ घालणारा नेमका महाभाग जिल्हा परिषदेतील असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पारनेर, नगर, अकोले तालुक्यांत जागा रिक्त नसल्याने शिक्षण सेवकांना येथे नियुक्ती दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने वेळोवेळी जाहीर केले होते. त्यामुळे या तालुक्यातील उमेदवारांनी सोयीची ठिकाणे निवडली, तसेच इतर जिल्ह्यातील उमेदवारांनीही जवळचे तालुक्याला प्राधान्य दिले. तथापि शनिवारी ऐनवेळी सेवकांपुढे श्रीगोंदे तालुक्यातील जागा रिक्त दाखवण्यात आल्या, त्यावेळी श्रीगोंद्यात रिक्त जागांच्या तुलनेत अधिक उमेदवार इच्छुक होते, पण तेथील उमेदवारांनाच त्या ठिकाणी थेट नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही उमेदवारांमध्ये नियुक्तीसाठी पर्याय देताना दुजाभाव केल्याची भावना निर्माण झाली आहे.
कोणी कुणाला चहा पाजला नाही
- नियुक्ती प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यात आली. सर्व उमेदवारांना एका सभागृहात बोलावून त्यांच्या गुणवत्तेनुसार नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील उमेदवारांना सोयीचा तालुका देण्याचे धोरण घेतले. पण नगर, पारनेर अकोले तालुक्यात जागा रिक्त नव्हती त्यांनी जवळचे तालुके घेतले. या प्रक्रियेत कोणी कुणाला चहा पाजला नाही, त्यामुळे घोडेबाजार झाल्याचा प्रश्नच येत नाही.''
अण्णासाहेब शेलार, उपाध्यक्ष,जिल्हा परिषद.
बातम्या आणखी आहेत...