आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. राजूरकर यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर । महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर हे निष्क्रिय असून बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेच्या मृत्यूस जबाबदार धरून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी नगरसेवकांनी बुधवारी सर्वसाधारणसभेत केली. शवविच्छेदन अहवालानंतर कारवाई करणार असल्याचे आयुक्त विजय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
शस्त्रक्रियेदरम्यान चंदा भुकन या महिलेचा मागील आठवड्यात मृत्यू झाला. याप्रकरणी राजूरकरांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी माजी महापौर संग्राम जगताप यांनी केली. दूषित रक्तपिशव्या प्रकरणी डॉ. अनिल बोरगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, मग राजूरकरांवर निलंबनाची कारवाई का होत नाही, असा प्रश्न नगरसेवक किशोर डागवाले यांनी केला. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. राजूरकर यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला, पण निखिल वारे, विनित पाऊलबुधे, किरण उनवणे, बाळासाहेब बोराटे, संगीता खरमाळे आदी नगरसेवकांनी त्यांना धारेवर धरून रुग्णालयातील गलथान कारभाराचे वाभाडे काढले. आयुक्त कुलकर्णी यांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
‘ते’ बेजबाबदारच - राजूरकर यांनी तीन वर्षांपूर्वी मनपाच्या खर्चातून लॅप्रोस्कोपी सर्जरीचे प्रशिक्षण घेतले. मात्र, ते या ज्ञानाचा उपयोग खासगी दवाखान्यात करतात. मनपा रुग्णालयात ज्या दिवशी महिलेचा मृत्यू झाला, त्या दिवशी ते एका खासगी रुग्णालयात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली पाटील यांनी दूरध्वनीवर संपर्क साधूनही ते वेळेवर रुग्णालयात हजर झाले नाहीत.