आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यांच्यावर जास्त विश्वास, अशांकडूनच होतो विश्वासघात..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ज्यांच्यावर अधिक विश्वास ठेवला जातो, अशांकडूनच विश्वासघात केला जातो. त्यामुळे महिला व मुलींनी अधिक सावध राहून स्वत:ची सुरक्षा वाढवण्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील डॉ. राजीव शारंगपाणी यांनी येथे बोलताना केले.

नगरकर्स क्लासेसच्या वतीने केशवदास नगरकर व रंजनाबाई नगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘आनंदमयी जीवन’ या विषयावर शनिवारी यशवंतराव चव्हाण सहकार सहकार सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. शारंगपाणी बोलत होते.

सुखी व आनंदी जीवनाच्या संदर्भात स्लाइड शो दाखवताना डॉ. शारंगपाणी म्हणाले, दु:ख व दुखणे म्हणजे नेमके काय हे समजावून घेतले पाहिजे. आपल्या दु:खासाठी दुसर्‍याला कधी जबाबदार ठरवू नका. स्वत:ची जबाबदारी ओळखायला शिका. योग्य वेळी जेवण व योग्यवेळी झोप हा मंत्र अंगीकारला, तर अनेक व्याधींपासून सुटका होईल व जीवन सहज आणि सुखी बनेल. ज्या खाद्यपदार्थांची जाहिरात केली जाते, ते टाकावू असतात हे लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या अंत:करणाची ओळख करून घेण्यासाठी आत्मिक ऊज्रेची म्हणजेच आपल्या श्वासाची ओळख करून घेणे आवश्यक असते, असेही ते म्हणाले.

गेल्या काही महिन्यांत महिला व मुलींबाबतीत घडलेल्या काही अप्रिय घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉ. शारंगपाणी म्हणाले, ज्यांच्यावर अधिक विश्वास टाकला जातो अशा लोकांकडूनच बर्‍याचदा विश्वासघात केला जातो, हे महिलांनी, विशेषत: शाळकरी मुलींनी लक्षात ठेवले पाहिजे. अशा गोष्टींचा सामना करण्यासाठी अधिक सावध राहून आपली शारीरिक तंदुरुस्तीच महत्त्वाची ठरणार असून त्याकरिता आपले शरीर मजबूत करण्यासाठी वेळ दिला पाहिजे.

शालेय जीवनात नियमित अभ्यासाबरोबरच आपल्याला आवडणारे अन्य विषयाचे शिक्षण घेतले पाहिजे. कोणतीही गोष्ट मनापासून शिकली, तर त्यामुळे व्यक्तिमत्व सुधारण्याबरोबरच मित्रपरिवार वाढण्यास मदत होते. छंदामुळे जीवनाला कलाटणीदेखील मिळू शकते, असे डॉ. शारंगपाणी यांनी सांगितले.

यश म्हणजे नेमके काय हे समजून घेऊन वाटचाल केली, तर जीवन घडवणे सोपे होते. आपल्याला आवडणारी चांगली गोष्ट केल्याने स्वत:बरोबरच अनेकांना आनंद देणे शक्य होते. जीवनाची वाटचाल करताना कठिण प्रसंगात अनेकांचा सल्ला घ्या. मात्र, कृती करताना आपल्या मनाला योग्य वाटेल त्याप्रमाणेच करा, असे डॉ. शारंगपाणी यांनी सांगितले.
संचालक विनोद नगरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.