आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Tamboli Elected On Central Advisory Committee

केंद्रीय सल्लागार समितीवर डॉ. तांबोळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केंद्र सरकारतर्फे लवकरच जिल्हा पातळीवर मुलांसाठी हस्तक्षेप उपचार केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. याबाबत नेमण्यात आलेल्या धोरणात्मक समितीवर सल्लागार म्हणून नगरचे बालरोग तज्ज्ञ डॉ. सुचित तांबोळी यांची निवड झाली आहे.

जन्मल्यापासून ते 18 वर्षे वयापर्यंत जन्मजात दोष, आजार, कमतरता, वाढीतील उशीर, अपंगत्व याबाबत लवकर निदान करून उपचार करण्याची गरज असते. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लवकरच असे ‘हस्तक्षेप केंद्र’ (डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर किंवा डीईआयसी) स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत पुण्याच्या केईएम रुग्णालयात नुकतेच चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात केंद्रीय कुटुंब कल्याण खात्याचे सचिव डॉ. अजय खेरा, राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून डॉ. वासुदेव रोकडे, युनिसेफतर्फे डॉ. चंद्रकला जैस्वाल, डॉ. आनंद पंडित, डॉ. सुधा चौधरी, डॉ. सुचित तांबोळी, डॉ. उज्‍जवल नेने, डॉ. सुनील गोडबोले, डॉ. अरुण सिंग, डॉ. सीमित इराणी, डॉ. अमरजित परशा व डॉ. सुचंद्रा मुखर्जी या तज्ज्ञांचा सहभाग होता. हे केंद्र कसे असावे, तेथे कोणत्या सोयी असाव्यात, कोणत्या चाचण्या घेण्यात याव्यात, टीम कशी विकसित करावी याबाबत तज्ज्ञांनी यावेळी विचार व्यक्त केले.

राज्य सरकारच्या आरोग्य कार्यक्रमाबद्दल बोलताना डॉ. रोकडे यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी नवजात अर्भक अतिदक्षता केंद्रे उभी राहिल्याने अर्भक मृत्यूदर कमी झाल्याचे सांगितले.
तांबोळींची कल्पना 21 वर्षांनी वास्तवात
डॉ. तांबोळी यांनी आपल्या ‘मुलांच्या समृद्ध जीवनासाठी’ या पुस्तकात 1992 मध्येच लवकर हस्तक्षेप उपचार केंद्राची संकल्पना मांडून तसे केंद्रही सुरू केले. या केंद्रात मानसशास्त्रज्ञ डॉ. देसले, समुपदेशक म्हणून नेहा तांबोळी, शैक्षणिक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून रश्मी येवलेकर काम पाहत आहेत. या संकल्पनेचा फायदा देशभर होणार आहे.