नगर- डाऊसिंग तंत्रज्ञानाने जमिनीतील पाण्याचा शोध घेण्याचा यशस्वी प्रयोग प्रा. दीपक पटारे यांनी डोंगरगण येथे नुकताच केला. प्रा. पटारे हे डॉ. विठ्ठलराव विखे अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य विभागात सहायक प्राध्यापक आहेत. डाऊसिंग तंत्रज्ञानाचा प्रयोग त्यांनी सर्वप्रथम 2011 मध्ये केला. याविषयी प्रा. पटारे म्हणाले, पृथ्वीच्या गर्भातून पाण्याच्या धमण्यांद्वारे विद्युतचुंबकीय लहरी बाहेर पडतात. या लहरी अँल्युमिनियम, कॉपर, सिल्व्हर अचूकपणे दाखवू शकतात. जो निरीक्षक या तंत्रज्ञानानुसार भूगर्भातील पाण्याचा शोध घेतो, त्याच्या शरीरातील ऊर्जेचा वापरही आपोआप होतो. पाण्याच्या शिरांची दिशांनी दोन रॉडस् फिरतात. वर्तुळाकार पद्धतीने फिरून पाण्याचे ठिकाण निश्चित करता येते. कूपनलिका घेताना पाण्याचे प्रवाह तुटतात, तसे रॉड फिरण्याचे थांबते.
डोंगरगण येथील राजू भुतकर यांना 360 फुटांपर्यंत कूपनलिका घेण्यास सांगितले. पण 130 फुटांपर्यंत जमिनीतील पाण्याच्या पाख्या तुटल्या. दीड इंच पाणी उपलब्ध झाले. आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेतानाही हा प्रयोग यशस्वी करून दाखवला, असे प्रा. पटारे यांनी सांगितले.