आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संचालक मंडळावर 15 दिवसांत कारवाई, तनपुरे कारखान्याविरुद्ध शेतकरी, कामगार एकवटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याकडून थकीत देणी देण्याचा तिढा चांगलाच चिघळला आहे. हक्काचे पैसे मिळावेत, यासाठी ऊसउत्पादक शेतकरी, कामगार, ऊस वाहतूकदार हे कारखान्याविरुद्ध एकवटले आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय व साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून त्यांनी संताप व्यक्त केला. पंधरा दिवसांत देणी न दिल्यास कारखान्याच्या संचालक मंडळावर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने आंदोलकांना दिले.
वारंवार पाठपुरावा करूनही कारखान्याकडून थकीत देणी मिळत नसल्याने देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कामगार, शेतकरी, वाहतूकदार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणे मांडून न्याय देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आंदोलकांनी लालटाकी येथील साखर सहसंचालक कार्यालय गाठले. आंदोलकांनी त्यांच्या संतप्त भावना तेथे व्यक्त केल्या. थकीत देणी न देणाऱ्या संचालक मंडळावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी यावेळी जमलेल्या आंदोलकांना कारवाईबाबत मािहती दिली.तनपुरे कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे पगार गेल्या साडेतीन वर्षांपासून थकले आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या चार वर्षांत कामगारांना आश्वासनाशिवाय काहीही मिळालेले नाही. त्यामुळे कामगार वर्ग देशोधडीला लागला आहे. आर्थिक विवंचनेमुळे कामगारांना दैनंदिन गरजा पूर्ण करणेही अशक्य बनले आहे.
साखर कारखाना स्थळावरील कामगार वसाहतीची वीजही तोडण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या 41 महिन्यांपासून कामगारांचे ५५ कोटी रुपये कारखान्याकडे थकीत आहेत. ग्रॅच्युइटी, बोनस, विमा, भविष्य निर्वाह निधी अशा सुविधा गृहीत धरून कामगारांचे 78 कोटी रुपये कारखान्याने थकवले आहेत. गेल्या हंगामात कारखान्याचे गाळप फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू होते. 15 जानेवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाचा पहिला हप्ता कारखान्याने शेतक-यांना दिला. मात्र, त्यानंतर गाळप करण्यात आलेल्या 60 हजार मेट्रिक टन उसाचा जवळपास 12 कोटी रुपयांचा पहिला हप्ताच कारखान्याने अद्याप दिलेला नाही. किमान आधारभूत किमतीनुसार कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाचे अकरा कोटी रुपये थकवले आहेत. गाळप झालेल्या उसाचा पहिला हप्ता पंधरा दिवसांच्या आत शेतक-याला देणे बंधनकारक असतानाही तनपुरे कारखान्याने पैसे थकवले आहेत. ऊस वाहतूकदारांचेही तीन कोटी रुपये या कारखान्याने गेल्या दोन वर्षांपासून थकवले आहेत. आंदोलनात बाळासाहेब चव्हाण, केशवराव कडू, दादा इंगळे, सुरेश थोरात, सुधाकर कराळे, सोमनाथ वाकडे यांच्यासह कामगार, शेतकरी, वाहतूकदार सहभागी झाले.
कवडीमोल मूल्यांकन
कारखान्याने सन 2011-12 मध्ये जिल्हा बँकेकडून 44 कोटी रुपयांचे अल्पमुदत कर्ज घेतले. वेळेत कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने कारखान्याला जप्तीची नोटीस बजावली आहे. कारखान्याच्या जवळपास 500 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे बँकेकडून अवघे 39 कोटी इतके मूल्यांकन करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारखाना वाचवण्याची मागणी आंदोलकांनी केली.