आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"आफ्टर लाँग इअर्स' कादंबरीने सार्थ ठरवले नाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आफ्टर लाँग इयर्स' कादंबरीचे भाषांतर २००७ मध्ये सुरू झाले. प्रारंभी तीन महिने सारे काही सुरळीत चालले, पण पुढे काही कारणांनी खंड पडला तो तब्बल दोन-अडीच वर्षांचा. २०१० मध्ये पुन्हा मुहूर्त सापडला आणि आता चक्क अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशनाचे भाग्य या कादंबरीला लाभले!
नगर कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक आणि महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक प्रकल्प संचालक प्रा. एन. बी. मिसाळ यांनी अनुवादित केलेली "आफ्टर लाँग इअर्स' ही कादंबरी नावाप्रमाणेच अनेक वर्षांनंतर वाचकांच्या भेटीस आली आहे. मूळ इंग्रजी कादंबरी डॉ. सरला बार्नबस यांनी लिहिली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची नगर शाखा आणि आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित समारंभात ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली.

प्रा.मिसाळ यांनी यापूर्वी डॉ. बार्नबस यांच्या "इन्सिडेंट अॅट वेव्हरली' या इंग्रजी कादंबरीचे "हवेली वेल्हरलेची' नावाने केेलेले भाषांतर पुणे विद्यापीठाच्या एम. ए. मराठीच्या अभ्यासक्रमात २००४ पासून आहे. त्यांनी आतापर्यंत दोन नाटके, वीस एकांकिका, कथासंग्रह, कवितासंग्रह, दोन चरित्रग्रंथ, तसेच एमपीएससीसाठी सोळा पुस्तके लिहिली आहेत. ई-टीव्ही मराठी वाहिनीवरील मराठी धारावाहिकांमध्ये अभिनेता म्हणूनही त्यांनी काम केले आहे. प्रा.मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखालील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रातून पारंगत झालेले साडेचारशेहून अधिक विद्यार्थी शासकीय सेवेत आहेत. अ. भा. स्वकुळसाळी समाजाचे मिसाळ निमंत्रित प्रतिनिधी असून शासनाने गतवर्षी त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.