नगर -पद्मश्रीविठ्ठलराव विखे कृषी परिषदेकडून बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास विरोध दर्शवण्यात आला आहे. पुरंदरे यांनी त्यांच्या लेखनातून शिवाजी महाराज जिजाऊंची बदनामी केल्याचा आरोप परिषदेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आला आहे.
पत्रकात म्हटले, ब. मो. पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती हे खोटा इतिहास बहुजनांची बदनामी करणारे पुस्तक आहे. पुरंदरे हे इतिहासकार तथा अभ्यासक अथवा शिवशाहीर नाहीत, असे इतिहास अभ्यासक संशोधकांचे जाहीर मत आहे. त्यांच्या पुस्तकात शहाजी राजे, शिवाजी महाराज, जिजाऊ, संभाजी महाराज शिवप्रेमींची बदनामी करणारा मजकूर आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे धिंडवडे या पुस्तकातून काढण्यात आले आहेत. अशा व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे म्हणजे महामानवाची बदनामी करणाऱ्याला पुरस्कार देणे ठरेल.
बहुजन समाजाचा हा अवमान आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्यांना दिलेला पुरस्कार रद्द करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर परिषदेचे विभागीय अध्यक्ष वंसतराव कार्ले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक रघुनाथ देवकर, जनहित कृती समितीचे कार्याध्यक्ष बाजीराव गावखरे, बहुजन सम्राट सेनचे अध्यक्ष राहुल साळवे, पांचाळ सुतार संघाचे अध्यक्ष सतिष क्षीरसागर, पंचशील युवा ग्रुपचे अध्यक्ष संजय गायकवाड यांची स्वाक्षरी आहे.