नगर - अद्यावतकृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतलेल्या कृषी उद्योजकांना घडवून शेतीच्या तंत्रात क्रांतिकारक बदल केले तरच शेती किफायतशीर आणि भाविष्यदायी ठरेल. स्नेहालय आणि सिंजेन्टा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केलेल्या ४५ दिवसांचा कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण अभ्यासक्रम या संदर्भात एक क्रांतिकारी पाउल ठरेल असे प्रतिपादन कृषिभूषण डॉ. दत्तात्रेय वने यांनी केले.
स्नेहालय आणि सिंजेन्टा फौंडेशन ने कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण अभ्यस्क्रमाची स्नेहालय संस्थेत सुरुवात केली. पूर्णतः प्रात्यक्षिकांवर आधारित असा हा अभ्यासक्रम स्नेहालायातील अलायन्स प्रशिक्षण केंद्रात सुरु करण्यात आला आहे. हिम्मातग्राम येथील २५ एकर क्षेत्र तेथील सुविधांचा वापर या प्रशिक्षणासाठी केला जाणार आहे. काल या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. वने यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे विलास नलगे, सिंजेन्टा फाउंडेशन चे कार्यकारी संचालक भास्कर रेड्डी, स्नेहालय संस्थेचे सचिव राजीव गुजर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सिंजेन्टा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश आपटे होते. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा आणि मुलाखतींद्वारे २० जणांची निवड करण्यात आली आहे.
४५ दिवसांचा हा पूर्णवेळ निवासी अभ्यासक्रम नाममात्र शुल्कात शिकण्याची संधी निर्माण केल्याने शाश्वत शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात येईल असे डॉ. वने म्हणाले. पंचामहाभूतांचा मदतीने केली जाणारी शेती, लागवडीचा खर्च वाढल्याने आणि विपणनाचे तंत्र शेतकर्यांना कोणीही नीटपणे शिकविल्याने शेती व्यवसायाबद्दल नकारत्मक दृष्टीकोन विकसित झाला. शेतीचा सबंध अर्थकारणाप्रमाणेच संस्कृतीशी आणि निरामय जीवनाशी देखील आहे. याबद्दल प्रबोधनाची गरज असल्याचे ते म्हणाले. रेड्डी म्हणाले सिंजेन्टा बिबीयाणे, खते आदी क्षेत्रात उत्पादन आणि पायाभूत संशोधन करणारी कंपनी आहे. आपले सामाजिक उत्तरदायित्व जपताना सिंजेन्टा फौंडेशन द्वारे जव्हार, पालघर, नांदेड, तसेच दुष्काळग्रस्त भागात थेट शेतकर्यांना प्रगत आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देत आहे.
अहमदनगर मध्ये भारतातील पहिला कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा प्रगत अभ्यासक्रम सुरु करताना नगर, बीड, औरंगाबाद येथील ग्रामीण भागाचे सर्वेक्षण करून त्याद्वारे हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आल्याचे रेड्डी म्हणाले. नलगे यांनी नमूद केले की ते स्वताः शेतकरी आहेत आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे सामर्थ्य लक्षात घेतले तर ग्रामीण आणि कृषी आधारित रोजगाराची प्रचंड निर्मिती शक्य आहे. अनिल गावडे यांनी प्रास्ताविक सूत्रसंचालन केले. मिलिंद कुलकर्णी यांनी आभार मानले. स्नेहालायचा पहिला कृषी पदवीधर झालेला माजी विद्यार्थी महेश मरकड या उपक्रमाचा समन्वयक म्हणून कार्यरत आहे. या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९०११११४५९१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.