आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन नगरसेवकांच्या वादात रखडले काम, पोलिस बंदोबस्तात काम सुरू करण्याचे आश्वासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नवीन सिव्हिल हडको परिसरातील रस्ता ड्रेनेजलाइनचे काम दोन नगरसेवकांच्या वादात रखडले आहे. प्रभाग क्रमांक १२ मधील दोन नगरसेवकांमध्ये या कामावरून वाद सुरू आहे. त्यामुळे मंजूर झालेले काम सुरू हाेत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी मंगळवारी आयुक्त दिलीप गावडे यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. वेळप्रसंगी पोलिस बंदोबस्तात काम करण्यात येईल, अशी ग्वाही गावडे यांनी नागरिकांना दिली.
प्रभाग १२ मध्ये असलेल्या नवीन सिव्हिल हडको परिसरात मागील काही वर्षांपासून कोणतेही विकासकाम झालेले नाही. सध्या हा भाग नेमका कोणत्या प्रभागात आहे, यावरून नगरसेवकांमध्ये वाद सुरू आहे. या वादामुळे परिसरातील नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिसरातील ड्रेनेजलाइन निकामी झाल्याने ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावरून वाहते आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिक वर्षभरापासून या समस्येबाबत मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. परंतु प्रशासनाकडून कोरड्या आश्वासनांशिवाय नागरिकांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी महापालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन निदर्शने केली. त्यानंतर जागी झालेल्या प्रशासनाने येथील ड्रेनेज रस्त्याचे काम मंजूर केले. परंतु मंजूर झालेले काम सुरू करण्यास संबंधित नगरसेवक अटकाव करत आहेत.

दोन नगरसेवकांच्या वादात मंजूर काम सुरू होत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी मंगळवारी आयुक्त गावडे यांचे दालन गाठले. त्यांनी आपले गाऱ्हाणे गावडे यांच्यासमोर मांडले. गावडे यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत तातडीने काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. वेळप्रसंगी पोलिस बंदोबस्तात काम पूर्ण करू, अशी ग्वाहीही गावडे यांनी दिली. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांच्यासह हडको परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...