आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक बँकेच्या सभेत गदारोळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - उपविधी मंजुरीसाठी झालेल्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या विशेष सभेत आठ टक्के ठेवी वाढवण्याच्या मुद्दय़ावरून गदारोळ झाला. ठेवीवरील व्याज वाढवण्यावरून सभासदांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा ओम गार्डन येथे रविवारी झाली. या वेळी अध्यक्ष चांगदेव ढेपले, उपाध्यक्ष नारायण राऊत, सुदाम भागवत, संजय कळमकर आदी उपस्थित होते. शिक्षक बँकेच्या सभांमध्ये नेहमीच मतभेद चव्हाट्यावर येतात. हीच परंपरा या सभेतही दिसून आली. लेखापरीक्षकाची नियुक्ती, घटना दुरुस्तीचे उपविधी, तक्रार निवारण समिती स्थापन करणे हे विषय सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तडजोड समिती स्थापन करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. बाबासाहेब आव्हाड व महादेव हासे हे या समितीचे सदस्य आहेत. आठ टक्के ठेवीच्या मुद्दय़ाला गुरुकुल मंडळाने विरोध केला. या मुद्दय़ावरून सभेत गदारोळ होऊन खडाजंगी झाला. संचालक मंडळाने शांततेचे आवाहन केले, परंतु सभासद ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. आठ टक्के ठेवी वाढवल्यामुळे शिक्षकांची ठेव 1 हजार 200 ते 1 हजार 500 रुपयांपर्यंत वाढणार आहे. तथापि, ठेवीवरील व्याजदर खूपच कमी अन् कर्जावरील व्याज दर जास्त आहे, असे गुरुकुलचे म्हणणे होते.

सभेत गोंधळ होत असल्याचे दिसू लागताच तातडीने सर्व विषयांना मंजुरी देऊन राष्ट्रगीत झाले.
महिला सभासद अनुपस्थित
बँकेच्या सुमारे साडेतीन हजार महिला सभासद आहेत. मात्र, सभेस त्या उपस्थित नव्हत्या. सभेत घाईघाईत विषय मंजूर करण्यात आले. एकाही महिला सदस्याने त्यास मंजुरी दिलेली नाही, असे गुरुकुलचे अध्यक्ष नितीन काकडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.