Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | drama theaters in ahmednagar

नगरमध्ये नाटकांकडे प्रेक्षकांची पाठ

प्रतिनिधी | Update - Oct 21, 2011, 09:13 AM IST

एकेकाळी नगरमध्ये वर्षभरात 200 नाट्यप्रयोग होत. आता ही संख्या दहाच्या आत आली आहे

 • drama theaters in ahmednagar

  नगर - एकेकाळी नगरमध्ये वर्षभरात 200 नाट्यप्रयोग होत. आता ही संख्या दहाच्या आत आली आहे! महिन्यातून एखाद-दुसरा प्रयोग होतो, तोही अपुऱया प्रेक्षकसंख्येनिशी. वाढलेल्या तिकीटदरांबरोबरच नगरकरांचे कमी झालेले नाट्यप्रेम हे यामागचे कारण आहे.
  यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह हे शहरातील एकमेव नाट्यमंदिर. पण तेथे केवळ नाटके होत नाहीत. बँकांच्या वार्षिक सभा व राजकीय पक्षांच्या मेळाव्यांसाठीही या सभागृहाचा वापर होतो. असे असूनही पूर्वी तेथे वर्षातून 150-200 नाटके व्हायची. ती पाहण्यासाठी नगरकर गर्दीही करायचे. गेल्या काही वर्षांत मात्र ही संख्या कमालीची घटली आहे. असेच चालू राहिले तर नाटक पाहण्यासाठी पुण्या-मुंबईला जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
  महागाईमुळे तिकिटांचे दर वाढले आहेत. पूर्वी 30 ते 80 रुपयांदरम्यान दर होते. आता त्यात तिप्पट वाढ झाली आहे. नाटक पाहणारा मध्यमवर्गीय माणूस शंभर, दीडशे रुपयांचे महाग तिकीट विकत घेऊ शकत नाही. घरातील चार-पाच जणांना नाटकाला आणायचे म्हटले, तर हजार रुपयाची नोट लागते. नाटक पाहणारा वर्ग प्रामुख्याने सावेडी भागात राहतो. सहकार सभागृह त्यांना लांब पडते. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही नाटकाला येऊ शकत नाहीत.
  नवीन नाट्यगृह बांधण्यासाठी महापालिकेला राज्य सरकारकडून निधीचा पहिला हप्ता मिळाला आहे. सर्जेपुऱयातील रंगभवन या जुन्या नाट्यगृहाची मोक्याची जागा मनपाकडे आहे. तेथे नाट्यगृह बांधणे सहज शक्य आहे. सावेडीबरोबरच रंगभवनचा विचार झाल्यास अंतराची अडचण दूर होऊन पाठ फिरवलेला प्रेक्षक पुन्हा नाटकाकडे वळू शकेल.
  सुजाण नाट्यरसिक घडवण्याचा प्रयत्न
  ४सुजाण प्रेक्षक ही नाटकांची मोठी गरज आहे. प्रशांत दामले, संतोष पवार, केदार शिंदे यांची नाटके हाऊसफुल्ल जातात. पण इतरांचे काय? अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कलाकार घडवण्याबरोबर नाट्यरसिक तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. शहरात नाटकाचा प्रयोग आहे हे अनेकांना माहितीच नसते. चांगल्या नाटकाचा प्रयोग असला की मी स्वत: अनेकांना एसएमएस करून नाटकाला येण्याविषयी कळवतो. प्रेक्षक तयार करण्यासाठी स्वस्त दरात नाटक योजना आम्ही हाती घेणार आहोत. सभासद होणाऱयांना वर्षभरात 12 व्यावसायिक व 4 स्थानिक नाटके यात दाखवली जातील.’’
  शशिकांत नजान,अध्यक्ष,नाट्य परिषद, नगर
  टीव्ही मालिकांमुळे प्रेक्षक दुरावले
  टीव्हीवर इतके कार्यक्रम, नाटके आणि बहुतेक सर्व कलाकार पहायला मिळत असल्याने आता खास त्यासाठी थिएटरमध्ये जाण्याची गरज लोकांना वाटत नाही. शिवाय धकाधकीच्या आयुष्यात वेळ राहिलाय कुठे? प्रयोगाला शंभर प्रेक्षक येणेही आता अवघड झाले आहे.
  काका शेजूळ, व्यवस्थापक, सहकार सभागृह
  प्रयोगाचा खर्चही वसूल होणे अवघड
  नगरमध्ये प्रयोग करणे नाटक कंपन्यांना आता परवडत नाही. खर्च जेवढा होतो तेवढेही उत्पन्न मिळत नाही. टीव्ही मालिका व निरनिराळ्या शोजमुळे कलाकारांची नाईट आणि चोचले वाढले आहेत. ते बाहेरगावी यायला तयार नसतात. बसचे भाडे, जाहिरात व अन्य खर्चातही गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या तुलनेत नगरमधील प्रयोगांचे उत्पन्न मिळत नाही. वर्षापर्यंत नाटकांची संख्या बरी होती. यंदा तर ती फारच घटली आहे.
  सतीश अडगटला, नाट्य व्यावसायिक

Trending