आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहातील अॅसिडमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - चहा आरोग्यास अत्यंत अपायकारक आहे. त्यात टॅनिन अॅसिड असून त्यामुळे रक्तवाहिन्या कडक होऊन हृदयाला रक्तपुरवठा होण्यास, तसेच रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. या अॅसिडमुळे हदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ डॉ. माधव जोशी यांनी केले.

सावेडीतील रावसाहेब पटवर्धन सभागृहात सुप्रभात ग्रूपच्या वतीने डॉ. जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ते म्हणाले, चहा आरोग्यास अपायकारक आहे. त्यातील टॅनिन अॅसिड हे चामडे कडक करण्यासाठी वापरतात. त्याच अॅसिडमुळे शरीरातील रक्तवाहिन्या कडक होतात. त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होऊन हृदयावर दाब येऊन हृदयविकाराचा धोका होऊ निर्माण शकतो, तसेच उच्च रक्तदाबासारख्या आजारांना सामोरे जावे लागते.

रिफाईंड तेल हेदेखील विष असून या तेलात कॉस्टिक सोडा वापरतात. या सोड्याचा गुणधर्म जाळून टाकणे असल्यामुळे तो शरीरातील पेशी जाळण्याचे काम करतो. व्हॅनिलिन हे झाडाला येणारे फळ आहे. सुवास यावा म्हणून व्हॅनिला आईस्क्रिममध्ये त्याचा वापर केला जातो. हे फळ उपलब्ध नसल्यामुळे व्हॅनिलासारखा वास येणारा, पण अल्प प्रमाणात डांबरापासून बनवलेला पदार्थ त्यात टाकला जातो. तो शरीरास अतिशय हानिकारक आहे. कोणत्याही प्रकारचे बेकरी पदार्थ हेदेखील स्लो पॉयझन आहेत, हे निदर्शनास आणून पर्यायी पदार्थांचा वापर कसा करावा याबाबत डॉ. जोशी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक अनिल वाबळे यांनी केले. सूत्रसंचालन आभार प्रदर्शन शैलेश राजगुरु यांनी केले.