आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी जायकवाडीला; कोरड सोनईकरांना, पिण्याच्या पाण्यासाठी अडवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे लाभक्षेत्रात रब्बीसाठी मिळणारे थोडेफार पाणीही लांबले आहे. सिंचनाची अशी वाट लागलेली असताना कालव्याद्वारे मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्यातही अडवणूक सुरू आहे.
जायकवाडीसाठी सध्या मुळा धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने सोनई गावासाठी दर पंधरा दिवसाला कालव्याद्वारे मिळणारे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन लटकले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लाभक्षेत्राची हाेत असलेल्या ससेहोलपटीकडे सरकार प्रशासनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
सोनई हे नेवासे तालुक्यातील बाजारपेठेचे मोठे गाव आहे. गावाची पिण्याच्या पाण्याची गरज मुळा धरणाच्या कालव्याद्वारे मिळणाऱ्या पाण्यातून भागवली जाते. दर तीन आठवड्यांनी मुळाच्या आवर्तनातून गावाला पाणीपुरवठा करणारा तलाव भरून घेतला जातो. यातून सोनईला जेमतेम आठवडाभर पुरेल इतके पाणी तलावात येते. वाढती लोकसंख्या पाण्याची गरज लक्षात घेऊन दर पंधरा दिवसांनी तलाव भरून देण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून इतर स्त्रोताच्या माध्यमातून पाण्याची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो. सलग दुष्काळामुळे यंदा पाण्याचे इतर स्त्रोतही कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी सोनईकरांना मुळाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. दिवाळीपूर्वी प्रशासनाने सोनई ग्रामपंचायतीकडून टँकरचे प्रस्ताव मागवले. प्रस्ताव दिल्यानंतर टँकर देता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ऐन दिवाळीत हक्काच्या पाण्यावाचून सोनईकरांचे हाल झाले.

पूर्वी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार जलसंपदा विभाग तलाव भरण्यासाठी पाणी सोडत असे. मात्र, यंदा धरणसाठे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवल्याचे परिपत्रक काढून सरकारने धरणसाठे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित दिले. त्यामुळे ग्रामपंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. सोनईचा तलाव भरून घेण्यासाठी चार आठवड्यांपूर्वी पाणी सोडण्यात आले. सध्या तलाव कोरडा पडला असून पिण्याच्या पाण्यासाठी सोनईकरांचे हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. आणखी किमान दोन ते अडीच आठवडे सोनईला मुळा धरणातून पाणी मिळणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले.

प्राधिकरणाचा निर्णय गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या आदेशानुसार मुळा धरणातून १७४० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास नोव्हेंबरला सुरुवात झाली. पाणीपातळी धरणाच्या दरवाजाखाली गेल्याने सध्या डावा उजव्या कालव्यातून मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. आदेशानुसार आणखी ४०० दशलक्ष घनफूट पाणी सोडणे बाकी आहे. कालव्यातून हे पाणी सोडण्यासाठी आणखी किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. जायकवाडीला जाणारे पाणी थांबल्याशिवाय सोनईचा तलाव भरून घेण्यासाठी पाणी सोडता येणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून ग्रामस्थांना सांगण्यात आले.

उद्यापासून बेमुदत उपोषण
जिल्हाधिकाऱ्यांनानिवेदन देऊनही पिण्यासाठी पाणी साेडल्याने सोनईचे संतप्त ग्रामस्थ ग्रामपंचायत पदाधिकारी, तसेच सदस्य आक्रमक झाले आहेत. तातडीने पाणी सोडल्यास नेवासे तहसील कार्यालयासमोर २० नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सिंचनासाठीच्या पाण्याचा बट्ट्याबोळ झालेला असताना पिण्याच्या पाण्यासाठीही लाभक्षेत्राच्या संयमाचा अंत पाहण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्यासाठीचे हाल लोकप्रतिनिधीनाही दिसत नसल्याचे चित्र आहे.

ही तर माेगलाई
बाजारपेठेचेगाव असलेल्या सोनईची तहान भागवण्यासाठी आठवड्यातून एकदा तलाव भरून देण्याची गरज आहे. तशी मागणीही केली. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. धरणसाठे पिण्यासाठी राखीव ठेवल्याचे सरकार सांगत असले, तरीही प्रशासन सोनईला पिण्यासाठी पाणी सोडण्यात हतबल असल्याचे सांगत आहे. नगर जिल्ह्यातील लोक तहानलेली ठेवून मराठवाड्याची तहान भागवण्याचा हा कोणता न्याय आहे. ही तर मोगलाई म्हणावी लागेल.'' नितीनदरंदले, ग्रामपंचायत सदस्य, सोनई.