आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिण्याच्या पाण्याची शहरात बोंबाबोंब ! पाणी वितरणाचे नियोजन कोलमडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पिण्याच्या पाण्यासाठी सध्या शहराच्या विविध भागातून नागरिकांची ओरड सुरू आहे. पाणी वितरणाचे नियोजन कोलमडल्याने अनेक भागात चार दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. केडगाव उपनगरात, तर तब्बल नवव्या दिवशी पाणी सोडले जाते. बालिकाश्रम परिसरातही गेल्या चार दिवसांपासून निर्जळी आहे. महापालिकेने नियमित व पुरेसे पाणी द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. बालिकाश्रम परिसरातील सुडके मळा, बोरुडे मळा, शिंदे मळा आदी भागातील नागरिकांनी विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत "दिव्य मराठी'कडे गुरुवारी गाऱ्हाणे मांडले.
विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत शहरातील विविध भागातून नागरिकांची ओरड सुरू आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तसेच अंतर्गत जलवाहिन्यांना लागलेल्या गळतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी पाणी सोडण्याबाबत व्हॉल्वमनकडून होणारा दुजाभाव व वरिष्ठ अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. बालिकाश्रम परिसरातील सुडके मळा, बोरुडे मळा, शिंदे मळा, लेंडकर मळा, बागडे मळा, जाधव मळा, कानडे मळा, धर्माधिकारी मळा आदी भागात मागील काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यापैकी काही भागात, तर गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात आलेले नाही. केडगाव उपनगरातही तब्बल नवव्या दिवसांनंतर पाणी सोडण्यात आले. या परिस्थितीमुळे नागरिकांना ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
महापालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली, तर उडवाउडवीची उत्तरे मिळतात, अशी नागरिकांची तक्रार आहे. व्हॉल्वमन पाणी सोडताना दुजाभाव करतात, नगरसेवकांच्या मर्जीतील ठरावीक भागात जास्त पाणी, तर ज्या भागात नगरसेवकांचे दुर्लक्ष आहे, तेथे कमी वेळ पाणी सोडण्यात येते. याबाबत व्हॉल्वमनला जाब विचारला, तर त्यांच्याकडूनही उलटसुलट उत्तरे मिळतात. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. अनेक भागात अवेळी पाणी सोडण्यात येत असल्याने महिलांची मोठी गैरसोय होते. काही भागात, तर चक्क मध्यरात्री पाणी सोडण्यात येते. त्यामुळे पाणी सोडण्याच्या वेळा गैरसोयीच्या नसाव्यात, अशी महिलांची मागणी आहे. विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून त्याकडे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केले आहे. नळांना सर्रासपणे इलेक्ट्रीक मोटार लावून पाणी भरण्यात येते. त्यामुळे अनेकांच्या वाट्याला पाणीच येत नाही. त्यामुळे इलेक्ट्रीक मोटार जोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणे आवश्यक आहे. एकूणच सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी मनपा प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत; अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय, असा इशारा विविध भागातील नागरिकांनी दिला आहे.
चार दिवस झाले पाणी नाही
- सुडके मळ्यात चार दिवसांपासून पाणी आले नाही. दुसरी कोणतीच पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे आमची माेठी गैरसोय होते. मनपाने नियमित पाणी दिले पाहिजे.''
अनिता बगाडे, गृहिणी.
अधिकाऱ्यांची उलट उत्तरे
- पाणी वेळेत व पुरेसे मिळावे, हीच आमची अपेक्षा आहे. परंतु मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी मिळत नाही. याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली, तर त्यांच्याकडून उलट उत्तरे मिळतात.'' सुरेखा अल्ली, गृिहणी.
पाण्यासाठी पायपीट
-चार दिवसांपासून आमच्या भागात नळाला पाणी सुटलेले नाही. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी आम्हाला पायपीट करावी लागते. पुरेसे पाणी देणे हे मनपाचे कर्तव्य आहे. ''
लक्ष्मीबाई बिल्ला, गृहिणी.
पाणी योजनांची प्रतीक्षा
शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने शहर सुधारित पाणीपुरवठा योजना व केडगाव पाणी योजना हाती घेतली आहे. परंतु दोन्ही योजना अद्याप कार्यान्वित झालेल्या नाहीत. शहर पाणी योजनेचे केवळ ६० ते ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर केडगाव पाणी योजना अंतिम टप्प्यात आहे. या दोन्ही योजनांच्या पाण्यासाठी नागरिक अनेक वर्षांसून प्रतीक्षा करत आहेत.