आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाचे चटके अाणि "अच्छे दिन'चा भ्रमनिरास, कवींनी मांडल्या समाजाच्या व्यथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर; दुष्काळ,नापिकी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, दहशतवाद यापासून ते राजकीय पक्ष आणि नेत्यांची दांभिकता, "अच्छे दे दिन'चा भुलभलैया, साहित्यिकांची पुरस्कार वापसी अशा अनेक गोष्टींना स्पर्श करणारे भाष्य, कविता... आणि समोर रसिकांमध्ये गृह, कृषी अशा अनेक खात्यांचे राज्यमंत्रिपद भूषवणारे राम शिंदे...निमित्त होते जामखेडच्या "कविता उत्सवा'चे.
स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या "कविता उत्सवा'त प्रा. फ. मुं. शिंदे, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, डॉ. महेश केळुस्कर, सतीश पिंपळगावकर, साहेबराव ठाणगे, सुरेश शिंदे यांच्यासारख्या प्रथितयश मान्यवरांबरोबर अमरावतीचे भारत दौंडकर, नितीन देशमुख, नांदेडचे नारायण पुरी, किनवटचे विनायक पवार, परळीचे अरुण पवार, कोल्हापूरचे आबा पाटील असे अनेक नव्या दमाचे कवी सहभागी झाले होते.

जामखेड येथील जिल्हा परिषद विश्रामगृहाच्या प्रांगणातील चिंच, िलंब आणि चाफ्याच्या झाडाखाली रविवारी सायंकाळी झालेल्या या बहारदार कार्यक्रमात प्रारंभी महाराष्ट्रातील महत्त्वाचा समजला जाणारा संत नामदेव पुरस्कार पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. केळुस्कर यांना देण्यात आला. संत नामदेवांचे शिल्प, शाल, श्रीफळ पाच हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उपस्थितांचं स्वागत संयोजक रामदास फुटाणे यांनी केलं. गजानन फुटाणे गौरव फुटाणे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना मंत्री शिंदे यांनी फुटाणे प्रतिष्ठानच्या वतीने २५ वर्षे सातत्य राखून चालू ठेवण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून यावर्षी प्रथमच आपल्याला या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. राज्याच्या मंत्रिमंडळात बढती मिळणार असल्याचे सुतोवाच वगळता त्यांनी कोणत्याही राजकीय किंवा साहित्यिक विषयावर बोलण्याचं टाळलं. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना डॉ. केळुस्कर म्हणाले, संत नामदेवांनी लोकांच्या भाषेत लिहिलं. त्यांच्या नावानं पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

पुरस्कार वितरणानंतर झालेल्या "कविता उत्सवा'त कवींनी रंग भरला. गझल, मुक्तछंद अशा विविध रचना सादर करताना त्या-त्या प्रांतातील भाषेचा आविष्कारही रसिकांना यानिमित्तानं अनुभवता आला. शेतकऱ्यांचं दु:ख, नापिकीमुळे होणाऱ्या आत्महत्या, भ्रूणहत्या, सामाजिक विषमता, शासनाचा निर्ढावलेपणा, राजकीय नेत्यांकडून होणारा भ्रमनिरास, दहशतवाद अशा अनेक गोष्टी कवितेेतून मांडण्यात आल्या. मुख्य म्हणजे पालकमंत्री राम शिंदे शेवटपर्यंत या कवितांचा आस्वाद घेत होते. "कविता उत्सवा'चं सूत्रसंचालन सुरेश शिंदे यांनी केलं. दरवर्षी एेकायला मिळणाऱ्या फ. मुं. शिंदे यांच्या मिश्किल कोट्या धमाल प्रश्नांना मात्र यावेळी रसिकांना मुकावं लागलं. फमुंची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी केवळ "मीनाकुमारी' ही गंभीर कविता सादर केली. "मिश'कील अशोक नायगावकर यांनी त्यांच्या स्वयंपाकघरातील शाकाहारी कत्तल कवितेत नवे रंग भरून मजा आणली.
नागराजचा "सैराट'
"फँड्री'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा गौरव मागच्या वर्षी करण्यात येणार होता. त्यावेळी त्यांना यायला जमलं नाही. यावेळी ते आले, त्यांचा सत्कार करण्यात आला. पण यावर्षी बोलवलेले "ख्वाडा'कार भाऊराव कऱ्हा़डे मात्र आले नाहीत. साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक लढवलेले डॉ. विठ्ठल वाघ, मिरजगावचे प्रकाश घोडके, नारायण सुमंत यांचीही अनुपस्थिती रसिकांना जाणवली. नागराज मंजुळे यांचा आगामी चित्रपट "सैराट' पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार असून त्यांच बहुतेक चित्रीकरण करमाळा परिसरात झालं आहे. चित्रपटात हा परिसर इतका सुंदर दिसतो की पर्यटक तिथे येऊ लागतील, असं त्यांनी सांगितलं.

फुटाण्यांवर कविता
रामदासफुटाणे यांनी बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी अशा अनेक राजकीय नेत्यांना आपल्या भाष्यकवितेचा विषय बनवले. पण जामखेडच्या "कविता उत्सवा'त त्यांनाच आपल्यावर केलेली कविता ऐकावी लागली. "भारत कधी कधी माझा देश आहे...' या रामदास यांच्या कवितेला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली. या २५ वर्षांत रामदास यांनी आपल्या राजकीय सामाजिक भाष्यकवितांबरोबर महाराष्ट्रातील अनेक कवींना देश-विदेशांत मोठा सन्मान मिळवून दिला, असं सांगत अरुण म्हात्रे यांनी विनोदाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या रामदास यांच्यावरील कविता सादर केली. या कवितेला जामखेडकरांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
गृह राज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते संत नामदेव पुरस्कार स्वीकारताना डॉ. महेश केळुस्कर. समवेत नागराज मंजुळे, फ. मुं. शिंदे, गजानन गौरव फुटाणे. छाया: अनिल शहा