आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drought Condition Affect Industrial Area In Nagar

उद्योगांवर घोंगावतेय दुष्काळाचे सावट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आर्थिक मंदीमुळे शहर व जिल्ह्यातील उद्योगांना घरघर लागली असतानाच महिन्याभरापासून पावसाने पुन्हा दडी मारल्याने या उद्योगांवर पुन्हा दुष्काळाचे सावट पसरले आहे. परतीचा पाऊस न झाल्यास नगर शहरातील 800 मोठय़ा व लघू उद्योगांना यंदाही दुष्काळाचा फटका बसणार आहे. गणेशाच्या आगमनासोबत आलेला पावसाचा थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

नगर शहर व जिल्ह्यात खासगी कारखाने, लघू उद्योग, सुक्ष्म उद्योग व सहकारी साखर कारखाने मिळून 6 हजार 500 उद्योग असल्याची नोंद जिल्हा उद्योग केंद्राकडे आहे. नगर शहरातील नागापूर एमआयडीसीत क्रॉम्प्टन, एल अँण्ड टी, किलरेस्कर हे मोठे उद्योग आहेत. नागापूर औद्योगिक वसाहतीत 720 मोठे व लघू उद्योग आहेत.

सुपे औद्योगिक वसाहतीत 80 छोटे व मोठे उद्योग आहेत. नागापूर व सुपा या दोन उद्योगांमध्ये सध्या 12 हजारांहून अधिक कामगार आहेत. नागापूर व सुपा औद्योगिक वसाहतीतील मोठय़ा व छोट्या उद्योगांमधून दरवर्षी सुमारे पाच ते सहा हजार कोटींची आर्थिक उलाढाल होते. मात्र, आर्थिक मंदीमुळे सध्या उद्योगांना घरघर लागली आहे. सलग दोन वर्षांपासून जिल्ह्यातील उद्योगांवर दुष्काळाचे सावट होते. यंदा मात्र जून-जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस झाल्याने उद्योगांना पुन्हा उभारी येईल, अशी अपेक्षा होती. 8 ऑगस्टपासून शहरासह जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने उद्योगांवरील दुष्काळाचे सावट आणखी गडद झाले आहे.

दोन वर्षांपासून मंदी व दुष्काळामुळे जिल्ह्यातील उद्योगांमधून मालाची मागणी 40 टक्क्यांनी घटली होती. यंदा दमदार पावसामुळे मालाच्या मागणीत वाढ होईल, अशी आशा होती. मात्र, पावसाच्या विर्शांतीमुळे ही आशा आता धूसर होण्याच्या मार्गावर आहे. बाजारांमधून मालाला मागणी घटल्यामुळे कारखान्यांमधील उत्पादनही मोठय़ा प्रमाणात कमी झाले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील सुपा व नगर औद्योगिक वसाहतींतील कारखान्यांमधून सुमारे 5 हजार कोटींची उलाढाल झाली होती. यंदा मंदी व कमी पावसामुळे उलाढाल आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या महिन्याभरात उत्पादन घटल्याने त्याचा फटका कारखानदारांबरोबरच कामगारांना बसला आहे.

महिन्याभरात 60 कोटींचा फटका
आर्थिक मंदी व पावसाने हुलकावणी दिल्यामुळे नागापूर औद्योगिक वसाहतीतील मोठय़ा व छोट्या कारखान्यांमधील उत्पादन 50 टक्क्यांनी घटले आहे. महिन्याभरात सुमारे 60 कोटींचा फटका उद्योगांना बसला आहे. क्रॉम्प्टन, एल अँड टी या मोठय़ा उद्योगांवर अवलंबून असलेल्या लघू उद्योगांना सर्वांत मोठा फटका बसला आहे. सप्टेंबरपर्यंत परतीचा पाऊस न झाल्यास उत्पादन आणखी घटणार आहे.’’ अशोक सोनवणे, अध्यक्ष , आमी संघटना.