आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावट दुष्काळाचे : तीन मंत्र्यांच्या जिल्ह्यात यंदाही टंचाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पाऊस लांबल्याने नगर जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती गंभीर होत चालली आहे. तीन मंत्री असलेल्या नगर जिल्ह्यातील आठ नगरपालिका क्षेत्रात सध्या पिण्याच्या पाण्याची बोंब असून, अनेक नगरपालिकांनी पाणी कपात सुरू केली आहे. ग्रामीण भागात, तर पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

जिल्ह्यात 2011 व 2012 या वर्षात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. दुष्काळाची सर्वाधिक झळ पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदे या तालुक्यांना बसली. पाण्याबरोबर चाराटंचाईही निर्माण झाली होती. टँकर, चारा डेपो व जनावरांच्या छावण्या यावर जिल्हा प्रशासनाने 1 हजार कोटींहून अधिक खर्च केला. मात्र, पाणीटंचाईचे संकट कमी झाले नाही. सन 2013 मध्ये पुरेसा पाऊस पडल्याने टंचाईच्या झळा जाणवल्या नाहीत. पण यंदा पुन्हा पाऊस लांबल्याने टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी 1 जूनपासून जिल्ह्यात पावसाला दमदार सुरुवात झाली होती. यंदा मात्र जून कोरडा गेला. गेल्या वर्षी जूनमध्ये 127 मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा केवळ 27 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलैतही समाधानकारक पाऊस न झाल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे व पालकमंत्री मधुकर पिचड हे तीन मंत्री आहेत. मंत्रिमंडळात प्रमुख खाती असलेल्या या मंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायमस्वरूपी उपाययोजनांअभावी टंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या अकोले शहरालाही सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो.

संगमनेर शहरातही पाणीटंचाई आहे. संगमनेरची लोकसंख्या 66 हजार आहे. शहराचा पाणीपुरवठा भंडारद-याच्या आवर्तनावर अवलंबून असतो. भंडारदरा व निळवंडे धरणातून आवर्तन सोडले जाते, त्यावेळी शहरातील पाच टाक्यांद्वारे 7 एमएलटी, तर आवर्तन खंडित झाल्यानंतर 4 एमएलटी पाणी नगरपालिकेमार्फत पुरवले जाते. शहराला महिनाभर पुरेल एवढाही पाणीसाठा करण्यासाठी पालिकेकडे कोणतीही व्यवस्था नाही. प्रवरा नदीचे आवर्तन एवढेच एकमेव पाणी उपलब्धतेसाठी साधन आहे.

पाथर्डी शहराची लोकसंख्या 30 हजारांच्या आसपास असून, शहरासाठी पाण्याचा स्त्रोत जायकवाडी धरण आहे. जायकवाडीतून खंडोबामाळ (शेवगाव) येथील जलशुध्दीकरण केंद्रात पाणी येते. तेथून अमरापूर साठवण टाकीद्वारे पाथर्डी परिसरातील 25 गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तो अनियमित आहे. चार दिवसांतून केवळ एक तास पाणी दिले जाते.

शेवगाव शहरालाही चार दिवसांआड पाणी मिळते. कर्जतला थेरवडी तलावातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या 12 दिवस पुरेल इतकेच पाणी तलावात शिल्लक असल्याने कर्जतला चार दिवसांआड पाणी मिळते. श्रीगोंदे शहराचा पाण्याचा मुख्य स्त्रोत घोड धरण आहे. धरणातून सुटलेल्या आवर्तनाचे पाणी वेळू तलावात साठवले जाते. गेल्या तीन वर्षांपासून शहराला केवळ 50 टक्के पाणी मिळते.

पारनेर शहराला सुपा औद्योगिक वसाहतीतून पाणी विकत घ्यावे लागते. त्याचा दर जास्त असल्याने ते पाणी घेणे ग्रामपंचायतीला परवडत नाही. हंगा धरणातून पाणी घेणे सोपे पडते. मात्र, धरण आता आटले आहे. सध्या पारनेर शहराला चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. कोपरगावला पाच दिवसांतून एकदा पाणी मिळते. जामखेडला भुतवडा तलावातून पाणीपुरवठा केला जातो. या तलावात सध्या 24 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून, ते दोन महिने पुरेल इतके आहे. त्यामुळे सध्या तरी जामखेडला पाणीकपात करण्यात आलेली नाही.
आवर्तनाकडे सर्वांचे लक्ष
श्रीरामपूरला भंडारद-याच्या आवर्तनातून पाणी मिळते. आवर्तनातून साठवण तळी भरून घेतली जातात. सर्वांचे लक्ष आवर्तनाकडे आहे. सध्या तीन दिवसांनी शहराला पाणीपुरवठा केला जातो. दहा दिवस पुरेल इतके पाणी तळ्यांत शिल्लक आहे. प्रवरासंगम येथून नेवासे शहर व नेवासे फाटा या भागाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अनेकदा ही पाणी योजना बंद पडते. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. सध्या शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.

शिर्डीला 4 दिवसांनी पाणी
राहाता तालुक्यात शिर्डी हे आंतरराष्ट्रीय देवस्थान आहे. राहाता व शिर्डीला सध्या चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. राहुरी शहरासाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत मुळा धरण आहे. देवळाली प्रवरालाही हाच स्त्रोत आहे. जवळ धरण असल्याने टंचाई नसली, तरी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्याच्या अनेक भागात आठवड्यातून एकदाच पिण्याचे पाणी मिळते आहे. त्यामुळे खासगी बैलगाड्या व टँकरला दिवसेंदिवस मागणी वाढत असून त्यांचेही दर वाढले आहेत.

306 टँकर सुरू
जिल्ह्यातील 242 गावे आणि 1115 वाड्यांना 306 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी 22 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेमार्फत चालवण्यात येणा-या बुºहाणनगर, मिरी-तिसगाव, चांदा, तसेच गळनिंब पाणी योजना थकबाकीमुळे वारंवार बंद पडत आहेत. नगर शहराला पाणी पुरवणा-या मुळा धरणाची पाणीपातळी खालावली आहे. जून उलटला, तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू झालेला नाही.