आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२११ गावे दुष्काळी सवलतींपासून वंचित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदा डिसेंबरपासूनच जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यात ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या ३०५ गावांचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. त्याला मंजुरीही मिळाली. मात्र, डिसेंबरमध्ये २११ गावे आणखी वाढली. त्याचा अहवाल शासनाला सादर झाला असला, तरी शासनाकडून अजून या गावांना मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ही २११ गावे दुष्काळी सवलतींपासून अजून वंचित आहेत.

जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४९७ मिलिमीटर आहे. गेल्या वर्षी ५९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र केवळ ३८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे डिसेंबरच्या मध्यापासूनच जिल्ह्याच्या दक्षिण भागातील नगर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड व श्रीगोंदे या भागात दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे.

सध्या जिल्ह्यात टँकरची संख्या कमी असली, तरी जानेवारी, फेब्रुवारीनंतर टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तीन वर्षांपूर्वीच्या दुष्काळात जिल्ह्यात ७०० टँकरने पाणी पुरवठा होत होता. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने केवळ ४०० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. यंदाही तीन वर्षांपूर्वीच्या दुष्काळाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे जिल्हा प्रशासनाने पाहणी करुन दुष्काळी गावांची यादी तयार केली होती.
पहिल्या यादीत ५० पैशांच्या आत आणेवारी असलेल्या ३५० गावांचा समावेश करण्यात आला होता. पहिल्या यादीतील गावांना दुष्काळी सवलती मिळत असल्या, तरी त्यानंतर डिसेंबर महिन्यात आणखी वाढलेली २११ गावे मात्र सवलतीपासून वंचित आहेत.

जिल्ह्यात खरिपाची ५८० गावे आहेत. आधीटी ३०५ गावे ५० पैशांच्या आत आणेवारी असलेली होती. त्यावेळी कमी आणेवारी असलेल्या गावांचा अहवाल प्रशासनाने सरकारला सादर केला आहे. आता ही संख्या ५१६ वर गेली आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सर्वाधिक १५८ गावे पन्नास पैशांच्या आत आणेवारी असलेली आहेत. त्याखालोखाल संगमनेर १३८, पाथर्डी ८०, शेवगाव ३४ अशी गावे आहेत.

दुष्काळी गावांना हे फायदे मिळतात
जिल्ह्यातील श्रीरामपूर, कर्जत व श्रीगोंदे हे तालुके रब्बीचे आहेत. उर्वरित सर्व तालुके खरिपाचे आहेत. ज्या गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे, ती शासन नियमानुसार दुष्काळी असतात. या गावांना शैक्षणिक शुल्कात माफी, वीजिबलात ३३ टक्के सवलत यासह अन्य सवलती दिल्या जातात.

शेतकरी दुहेरी संकटात
यंदा कमी पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी भागात खरिपाचे पीक वाया गेले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले असतानाच पुन्हा गारपिटीच्या पावसामुळे आहे त्या पिकांचे नुकसान झाले. त्यातच मागील दोन दिवसांपासून शहर व जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटांत सापडले आहेत.