आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळात पोषण आहार योजना फक्त कागदावरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शासनाने उन्हाळ्याच्या सुटीतही शालेय पोषण आहार शिजवून मुलांना देण्याचे आदेश दिले आहेत. खिचडी शिजवण्यासाठी शिक्षक शाळेत येत आहेत. परंतु, सुटीमुळे मुले येत नसल्याचे चित्र सध्या सर्व शाळांमध्ये दिसत आहे. त्यामुळे ही योजना केवळ कागदोपत्रीच राबवण्यात येत असल्याचे चित्र आहे.

उन्हाळ्याच्या सुटीतही मुलांना शालेय पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने शिक्षकांना शाळेत येऊन पोषण आहार शिजवणे बंधनकारक केले आहे. श्रीरामपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 128 प्राथमिक शाळा असून सुमारे 445 शिक्षक आहेत. या शासनाच्या आदेशामुळे शिक्षक शाळेत येत आहेत. परंतु, मुले शाळेत येत नसल्यामुळे फक्त हजेरीपत्रकावर सह्या करून शिक्षकांना घरी जावे लागत आहे. दुष्काळात मुलांचे कुपोषण होऊ नये हा हेतू ठेवून ही योजना सुरू केली.

उन्हामुळे मोठय़ांनाही घराबाहेर पडणे शक्य होत नसताना छोट्यांना शाळेत जाणे कसे शक्य होईल, हा प्रo्न लक्षातच घेतला नाही. तसेच या काळात घरातील लोक लग्न कार्यासाठी बाहेर जातात व मुलांना घरी थांबावे लागते. यामुळे सुटीचा आनंद घेणारे विद्यार्थी फक्त शाळेत येणार कसे.

माध्यमिक शाळेत शिकणार्‍या काही विद्यार्थ्यांना बाहेर गावाहून यावे लागते. त्यांना सुटीत बसचा पास मिळत नाही. त्यामुळे असे विद्यार्थी पोषण आहारासाठी तिकीट काढून शाळेत येऊ शकत नाहीत. बहुतांश विद्यार्थी सुटीमध्ये नातेवाईकांकडे बाहेरगावी गेल्यानेही शाळेत येत नाही. दुष्काळी परिस्थितीमध्ये मुलांना पोषण आहार मिळायला हवा याबद्दल कुणाचेही दुमत नाही. परंतु प्रतिकूल परिस्थितीत मुलांनी केवळ आहार घेण्यासाठी शाळेत यावे यासाठी आग्रह धरणे चुकीचे आहे. आहार मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शाळेबरोबरच सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

विद्यार्थीसंख्येसाठी दवंडी
विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी गावांमध्ये दवंडी दिली आहे. काही ठिकाणी गाड्या फिरवून माहिती दिली आहे, तरीही उपस्थिती कमी आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत उपस्थितीचा आढावा घेणार असून उन्हाळ्यातील पोषण आहार देण्याकरिता विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’ रामदास हराळ, गटशिक्षणाधिकारी.