आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तमाशा व्यवसायालाही दुष्काळाच्या झळा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दुष्काळामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा मोठय़ा तमाशा फडमालकांना उतरत्या भावाने सुपार्‍या ठरवण्याची वेळ आली आहे. यातून सर्व खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव ही ‘तमाशाची पंढरी’ म्हणून ओळखली जाते. हुताशनी पौर्णिमा (होळी) होताच राज्यातील सर्व तमाशांच्या राहुट्या येथे लागतात. या राहुट्या म्हणजे तमाशा व्यावसायिकांची संपर्क कार्यालयेच असतात. राज्यातील विविध गावांच्या यात्रा कमिट्या येथे सुपार्‍या ठरवतात. ही परंपरा सुमारे 60 वर्षांची आहे. तमाशाचा ‘सीझन’ वैशाख पौर्णिमेपर्यंत चालतो. काही गावांमधील यात्रा महाशिवरात्रीनंतर होतात. या दोन महिन्यांतील सगळ्या महत्त्वाच्या तिथी आधीच आरक्षित केल्या जातात. सध्या नारायणगावात राज्यातील 33 मोठय़ा तमाशांच्या राहुट्या आहेत.

एकीकडे तमाशांचे फड गावागावांत आपली कला सादर करीत असताना दुसरीकडे या राहुट्यांमध्ये तमाशांचे व्यवस्थापक सुपार्‍या ठरवण्यात मग्न आहेत. यंदा मराठवाड्यासह नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत तीव्र दुष्काळ आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधून तमाशांना मिळणार्‍या सुपार्‍यांच्या बिदागीत घट झाली आहे. मोसमात प्रत्येक फडमालकाचे एक-दोन दिवस कोरडेच जातात. तिथी नसल्याने हा ‘गॅप’ सहन करावा लागतो. एखादी तिथी लाखोंची कमाई करून देते. अर्थात तमाशा कितपत लोकप्रिय आहे, यावर बिदागीचा आकडा ठरतो. त्यामुळे साहजिकच या दोन महिन्यांतला प्रत्येक दिवस फडमालकासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. फड उभा करण्यासाठी मालकाला आधीपासून लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते. त्यासाठी त्याला ओळखीच्या लोकांकडून (खासगी सावकाराकडून) उचल घ्यावी लागते. या रकमेतून फडमालक कलाकार व कर्मचार्‍यांना आगाऊ रक्कम ‘पगार’ म्हणून देतो. उर्वरित हिशेब ‘सीझन’ संपल्यानंतर होतो. एका तमाशामध्ये सरासरी 120 लोकांचा राबता असतो. फडमालकाला हा लवाजमा दोन महिने सांभाळावा लागतो. म्हणजे दरडोई सरासरी 20 ते 35 हजार रुपयांचा खर्च येतो. यंदा दुष्काळामुळे यात्रांच्या वर्गणीत घट झाली आहे. परिणामी तमाशांच्या सुपार्‍यांचे आकडेही उतरले आहेत.

टॉप टेन तमाशांचे फड : मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळ, रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ, पांडुरंग मुळेसह मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, कुंदा पाटील पिंपळेकर-पुणेकर, मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ, हरिभाऊ बडे-नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ, दिलीप काटे-भूमकर लोकनाट्य तमाशा मंडळ, आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ, भिका-भीमा सांगलीकर, काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ, दत्ता महाडिक लोकनाट्य तमाशा मंडळ.

सरकार दरबारी कलावंतांची परवडच
कलाकारांना शासकीय मानधन वाढवून द्यावे, पठ्ठे बापूराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 22 डिसेंबरला शासनाने पाच पुरस्कार द्यावेत. म्हाडातर्फे कलाकारांसाठी घरे बांधून द्यावीत, तमाशाच्या वाहनांकडून केली जाणारी टोलवसुली तत्काळ बंद करावी.’ संभाजी जाधव-संक्रापूरकर, अध्यक्ष, राज्य लोकनाट्य तमाशा परिषद
दरवर्षी दोन लाखांपर्यंत जाणारी सुपारी दीड लाखावर आली आहे. तरीही सामाजिक भान ठेवून आम्ही खटाव तालुक्यात एका छावणीला एक ट्रक चारा दिला. पडवळ (जि. सातारा) गावात यंदा बिदागीची रक्कम न घेण्याचा निर्णय घेतला आहे.’ मंगला बनसोडे, फडमालक, मंगला बनसोडे तमाशा मंडळ.
अलीकडे स्वरूप बदलले असले, तरी निखळ मनोरंजनाचा हेतू कायम आहे. आजही ‘माहितीचा अधिकार’, ‘लेक वाचवा अभियान’, ‘भ्रष्टाचाराविषयी जनजागृती’, ‘हुंडाबळीला विरोध’ ‘पर्यावरण रक्षण’ या विषयांवर वगनाट्य सादर केली जातात.’ प्रमोद जाधव, तमाशा अभ्यासक, घोडेगाव