आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळ: मोठय़ा धरणांनी गाठला तळ !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे ही मोठी धरणे वगळता बहुतांशी तलाव कोरडे पडले आहेत. या तीन मोठय़ा धरणातील पाण्यानेही आता तळ गाठला आहे. या तिन्ही धरणांत मिळून अवघा 1013 दशलक्ष घनफूट (2.77 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी देणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. शिल्लक मृतसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील नागरिकांना यंदा दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. शहरांची अवस्था फारशी वेगळी नाही. नगर शहराला पाणी पुरवठा करणार्‍या मुळा धरणात मेअखेर अवघा 4813 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. मुळाचा मृतसाठा 4500 दशलक्ष घनफूट आहे.
भंडारदरा धरणात मेअखेर 908 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उरला आहे. निळवंडे धरणात मेअखेर 227 दशलक्ष घनफूट साठा उरला आहे. त्यापैकी 92 दशलक्ष घनफूट पाणी सोडल्यास मृतसाठाच उरणार आहे. भंडारदरा, मुळा व निळवंडे या तीनही धरणांत मिळून मेअखेर 5948 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. मेअखेर भंडारदरा धरणात 608, मुळामध्ये 313 व निळवंडे धरणात 92 दशलक्ष घनफूट उपयुक्त साठा शिल्लक होता. त्यामुळे दुष्काळाच्या झळा आता आणखी तीव्र होणार आहेत.
मध्यम प्रकल्प असलेल्या आढळा धरणात फक्त 43 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. मांडओहोळ व घाटशिळ पारगाव हे दोन्ही प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.