आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Drought In Maharashtra But Karjat To Solve Sheti Tale

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकीचे बळ: शेततळ्यांतून दुष्काळावर मात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत: कर्जत तालुका दुष्काळात होरपळत असताना याच तालुक्यातील ‘मॉडेल व्हिलेज’ म्हणून ओळखला जाणार्‍या टाकळी खंडेश्वरी गावातील लोक मात्र निश्चिंत आहेत. शेततळ्याच्या माध्यमातून ग्रामीण रोजगार योजना प्रभावीपणे राबवून केलेल्या जलव्यवस्थापनातून या गावाने दुष्काळावर मात केली आहे. यामुळे गेल्या 12 वर्षांपासून या गावात टँकर आलेला नाही. जलव्यवस्थापन, निसर्गाचे संवर्धन, वृक्षलागवडीतून दुष्काळाशी दोन हात करण्याचा यशस्वी मार्ग ग्रामस्थांनी शोधला आहे. या कामाची दखल घेत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गावाला ‘पर्यावरणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जामखेड-श्रीगोंदा रस्त्यावर माहिजळगाव चौफुल्याजवळ 2700 लोकसंख्येचे टाकळी खंडेश्वरी हे गाव. काही वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीमुळे लोक कामाच्या शोधार्थ इतरत्र स्थलांतर करत होते. जलसंधारण व सामाजिक वनीकरणाचा योग्य उपयोग केल्यास गावची स्थिती बदलता येऊ शकते. याची जाणीव झाल्यानंतर 5 वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी ‘मॉडेल व्हिलेज’ संकल्पनेत सहभागी होण्यासाठी विशेष ग्रामसभा घेतली. पालकमंत्री बबनराव पाचपुते, तत्कालीन कृषिमंत्री व सध्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी जलसंधारण व वनीकरणाच्या कामाला सुरुवात केली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलीत ग्रामअभियान, हरियाली योजनेच्या माध्यमातून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ कार्यक्रम हाती घेतला.रोजगार हमी योजनेतून गावात 120 शेततळी तयार झाली. ग्रामस्थांना रोजगार मिळून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटला. तालुक्यात तीव्र दुष्काळाच्या झळा बसत असताना येथे मात्र घरासमोरील नळाला महिला आनंदाने पाणी भरतात. पाझर तलावामुळे भूजल पातळीत वाढ झाली. परिणामी, शेतीला पाणी मिळू लागल्याने आपसूकच स्वत:च्या शेतात काम मिळाल्याने बाहेर स्थलांतर करणार्‍यांची संख्या कमी झाली. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्याने गावातील बंधारे व शेततळ्यात मुबलक पाणी उपलब्ध आहे. जलसंधारणातून गावाने ही किमया साधली आहे.