आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाचे सावट अधिक गडद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पावसाळासुरू होऊन तीन महिने उलटले, तरी सरासरीच्या अवघे ३१.६० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे संपूर्ण खरीप वाया गेला असून रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा, तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मोठा खर्च करून पेरलेली पिके करपल्याने ते काढण्याचे धाडसही आता शेतकऱ्यांमध्ये उरले नाही. ढग दाटून येतात, पण बरसत नाहीत. दररोज सुरू असलेल्या या ऊन-सावल्यांच्या खेळाने दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे.
मागील वर्षी सरासरीच्या ७६ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला, पण खरिपाचे पीक साधले होते. ऑगस्ट महिन्यात शेतात बाजरी, सोयाबीन, कपाशीची पिके डोलत होती. यंदा मात्र जून ते ऑगस्ट या कालावधीत पावसाने दमदार हजेरी लावली नाही. पेरणी केलेली पिके पाण्याअभावी करपून गेली. अनेक ठिकाणी पेरणीच होऊ शकली नाही.

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल लवकरच सादर केला जाईल. पण अनुदान किती केव्हा मिळेल हे कोणी सांगू शकत नाही. चारा डेपो छावण्या सुरू करण्यासाठी जिल्हाभरातून प्रशासनावर दबाव वाढतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने २४ ऑगस्टला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येणार आहे. प्रशासनाकडून चारा डेपो छावण्या सुरू करण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा परिषदेत ३१ ऑगस्टला टंचाई उपाययोजनांसाठी सभा बोलावण्यात आली आहे.

शासनाने तातडीने टंचाई निवारणार्थ पॅकेजची घोषणा करावी, तसेच कृत्रिम पाऊस पाडण्याचे नियोजन करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला आता अनुदानरुपी दिलाशाची प्रतीक्षा आहे.

अवघा ३१.६०% पाऊस
जिल्ह्यातमागील वर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत सरासरीच्या ७६.८३ टक्के पाऊस झाला होता. यंदा मात्र ऑगस्ट संपत आला, तरी ३१.६० टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे परतीचा पाऊस पडला नाही, तर रब्बीची आशाही मावळणार अाहे.

महसूलच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे
जिल्ह्याततीव्र टंचाई स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर परिषदेत टंचाई आढावा सभा बोलावली आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ११४ नुसार महसूल अधिकाऱ्यांनाही सभेला उपस्थित राहण्याबाबत कळवले आहे. मागील अनुभवानुसार अधिकारी उपस्थित रहात नाही. यासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची भेट घेणार आहे.'' मंजूषागुंड, अध्यक्ष, जिल्हा परिषद.