आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळाच्या झळांनी शेतकरी हवालदिल, चाऱ्याचे भाव भिडले गगनाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दूध उत्पादनात राज्यात अग्रेसर असलेल्या नगर जिल्ह्याची अवस्था दुष्काळामुळे बिकट झाली आहे. तलाव कोरडे पडले विहिरींनी तळ गाठला, चाऱ्या अभावी जनावरे बाजारात विक्रीसाठी आणली जात आहेत. महागडा चारा घेऊन जनावरे जगवण्याची जिद्द बाळगणाऱ्या पशुपालकांना दुधाचे दर घसरल्याने तोटाच होत आहे. त्यातच लाखो नागरिकांना पिण्यासाठीच पाणी नसल्याने प्रशासनाने टँकरचा पर्याय दिला. पण त्यातही मंजुरी मिळालेल्या एकूण खेपांपैकी दररोज ६० खेपा पोहोचतच नाही. अशा भीषण परिस्थितीत छावणी आणि चारा डेपोचीही मागणी जोर धरत असताना पालकमंत्री राम शिंदे शनिवारी (१९ मार्च) होणाऱ्या बैठकीत निर्णय घेणार का? असा सवाल शेतकरीवर्गातून उपस्थित केला जात आहे.

दुष्काळ जिल्ह्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे, भौगोलिक विषमतेबरोबरच पर्जन्यमानही विस्कळीत स्वरुपाचे असते. राज्यात क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या या जिल्ह्यात २०११ पासून दरवर्षी टंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे. शेती आणि दूध व्यवसाय हा जिल्ह्याचा आर्थिक कणा मानला जातो. परंतु, यावर्षी सरासरीच्या ७९ टक्केच पावसाची नोंद झाली. त्यातही सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यात पडला. अत्यल्प पर्जन्यमानामुळे मागील दोन तीन वर्षांपासून कोरडे पडलेले तलाव भरलेच नाही. ऑक्टोबरअखेरपर्यंत झालेल्या पावसामुळे डिसेंबरपर्यंत विहिरीत जेमतेम पाणी आले, या पाण्यावर बागायतदारांनी पीके घेण्याचे धाडस केले, पण जानेवारीपासूनच विहिरींनी तळ गाठला. शेतीसाठी तर नाहीच, पण पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २२९ गावे आणि हजार २४३ वाड्या वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. नियोजित गावांसाठी ३३१ टँकरने दररोज ७३१ खेपा मंजूर आहेत. दररोज ६० खेपा गरज असतानाही मिळत नाहीत. जिल्ह्यात २०१२ च्या जनगणनेनुसार १६ लाख ४८ हजार ५४८ जनावरे आहेत. त्यात लाख हजार लहान जनावरांचा समावेश आहे. शेतीबरोबरच पशुपालनाचा व्यवसाय करणारे शेतकरी तसेच केवळ दुधव्यवसायासाठी पशुपालन करणाऱ्यांचीही संख्या मोठी अाहे. सध्या जनावरे ज्वारीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या वैरणीवर अवलंबून आहेत. अपवादात्मक ठिकाणीच हिरवा चारा उपलब्ध आहे. शासनाने जिल्ह्यात सद्यस्थितीत १४ लाख ६८ हजार ८०१ टन चारा उपलब्ध असल्याची माहिती दिली. प्रत्यक्षात हा चारा किती शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे ? याची कोणतीही माहिती शासनाकडे सध्यातरी नाही. ज्यांच्याकडे चाराच नाही, पण परंतु, उदनिर्वाहच पशुपालनावर अवलंबून आहे त्यांना महागडा चारा खरेदी केल्याशिवाय पर्याय नाही. सध्या वैरण तीन ते चार हजार रुपये शेकडा, मुठभर घासाच्या चार पेंड्या दहा रुपये, ऊस हजार २०० ते हजार ६०० रुपये टन, महागडा चारा खरेदी करून आर्थिक गणित बसवणे कठीण बनल्याने चारा छावण्या तसेच चारा डेपो सुरू करण्याची मागणी जोर धरीत आहे.

जिल्ह्यातील दुष्काळाची स्थिती
लोकसंख्या-५ लाख ५२ हजार, टँकर - ३३१, जनावरे - -१६ लाख ४८ हजार ५४८, कोरडा चारा - १४ लाख ६८ हजार ८०१ टन, बंद हातपंप -सहा हजार, बंद पाणी योजना - २००.

उपाय योजना हाती घेतल्या
टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यापूर्वीच उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सध्या जिल्ह्यात मुबलक चारा आहे. दोन महिने हा चारा पुरेल. ज्या भागातून टँकरला मागणी येते त्या भागात तातडीने टँकर देण्यात येत आहेत.टँकरच्या नियोजित खेपा पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. अनिल कवडे, जिल्हाधिकारी.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज टंचाई आढावा बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (१९ मार्च) दुपारी वाजता जिल्हास्तरीय टंचाई आढावा बैठक आयोजित केली आहे. बैठकीत जिल्हातील पाणी टंचाई चारा टंचाईचा आढावा घेण्यात येणार आहे. बैठकीसाठी सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या टंचाई आढावा बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

दररोज एका जनावराला हवे ४० लिटर पाणी
दररोज एका लहान जनावराला २० लिटर, तर मोठ्या जनावरांसाठी ४० लिटर पाणी लागते. त्यानुसार जिल्ह्यातील १६ लाख जनावरांची संख्या पाहता जनावरांना पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र पाण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.

आम्ही जगावे की मरावे ?
गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने चाऱ्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. महगडा चारा खरेदी करून पशुधन जगवणे कठीण बनले आहे. पीके वाया गेली, दुधालाही भाव मिळेना त्यातच महागाईचा भडका उडाल्याने आम्ही जगावे की मरावे असा प्रश्न पडला आहे. शासनाने तातडीने छावण्या सुरू कराव्यात. मंगेश ससे, शेतकरी,वांबोरी
बातम्या आणखी आहेत...