आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथकांचा दौरा दुष्काळी पर्यटनासाठीच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर; जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना केंद्रीय पथक बोलावण्याचा फार्स चालला आहे. सरकारने प्रथम हा फार्स थांबवायला हवा. शेतकरी आत्महत्या करत असताना पथके केवळ दुष्काळी पर्यटनासाठी येतात, असा टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत लगावला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, काँग्रेसचे विनायक देशमुख, उबेद शेख आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, सध्या केंद्रातील पथके येऊन जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करत आहेत. प्रत्यक्षात दुष्काळी दौरा हा फार्स आहे. सरकारने हा फार्स थांबवायला हवा. बीडमध्ये पाहणीसाठी आलेल्या पथकाला बीडच्या शेतकऱ्यांनी अडवून यापूर्वी झालेल्या दौऱ्याचे काय केले असा जाब विचारला. एलबीटी टोलमाफी धोरण घेतले. यापोटी सुमारे ३५ हजार कोटी देण्यात येणार आहे. पण आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आम्ही केवळ १३ हजार कोटीच मागितले, पण तेही दिले नाहीत. केंद्रीय पथके केवळ दुष्काळी पर्यटनासाठी येतात.
सरकारने शेतकरी वाचवण्याची भूमिका घेण्याची गरज आहे. केवळ निवडणुका असल्या की, घोषणा करण्याचेच सरकारने ठरवले आहे. याचे उत्तरही जनतेने बिहार निवडणुकीत दिले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क भरल्यानंतर शासनाने दुष्काळ जाहीर केला. अनेक विद्यार्थ्यांनी भरण्यासाठी शुल्क नसल्याने शिक्षण सोडले. विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर पास माफ केला जातो. मग आता इतर जिल्ह्यांतही विद्यार्थ्यांच्या आत्महत्या केल्यानंतर मोफत पास देणार का, असा सवाल करत विखे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला.

पालकमंत्री शिंदे गप्प
पाणी प्रश्नाविषयी पाणी वाटपाच्या कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. पण जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे पाणीप्रश्नी तोंडाला पट्ट्या लावून बसले आहेत. आंदोलने केली, तरीही पाणी गेले. शासनाने वेळीच हस्तक्षेप करून न्यायालयात बाजू मांडायला हवी होती, असेही विरोधी पक्षनेते विखे म्हणाले.