आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 हजार 700 खड्ड्यांनी हाडे झाली खिळखिळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खड्ड्यांचे शहर - पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची वाट लागली आहे. रहदारी असलेल्या प्रमुख रस्त्यांवर इंच ते एक फूट खोलीपर्यंतचे शेकडो खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे नगरकरांचे मणके, कंबर, मान आणि पाठीचे दुखणे वाढले आहे. केवळ दुखणेच नाही, तर त्यांच्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे नगरकरांना मणक्यांच्या आजारासह अार्थिक भुर्दंडदेखील सहन करावा लागत आहे. ‘दिव्य मराठी’ने खड्ड्यांचा प्रश्न वेळोवेळी मांडला. यावेळी ‘दिव्य मराठी’च्या टीमने शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डे मोजले असता त्यांची संख्या सुमारे 8 हजार ७०० असल्याचे निदर्शनास आले.

वर्षानुवर्षे खड्ड्यांच्या डागडुजीचे चक्र सुरू आहे, तरी शहरातील रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांची संख्या कमी झालेली नाही. उलट दर तीन महिन्यांनी रस्ते डागडुजीच्या नावावर (पॅचिंग) लाखो रुपयांची उधळपट्टी महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. मागील पाच-सहा वर्षांत पॅचिंगच्या कामावर दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला आहे. नागरिकांना दर्जेदार रस्त्यांची सुविधा देणे ही महापालिकेतील नगरसेवक, इतर पदाधिकारी प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु या जबाबदारीकडे सर्वांनीच पाठ फिरवली आहे. अनेक रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. दिल्ली दरवाजा ते पत्रकार चौक, नेप्तीनाका चौक ते आयुर्वेद महाविद्यालय, लालटाकी ते सर्जेपुरा चौक, प्रोफेसर कॉलनी चौक ते भिस्तबाग नाका, रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता, पाइपलाइन गुलमोहोर रस्ता, कापडबाजार, पंचपीर चावडी या रस्त्यांसह उपनगरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी तर वाहनचालकांवर अक्षरश: रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. तसेच अनेकांना लहान-मोठ्या अपघातालाही सामोरे जावे लागत आहे.

कोटींचा खर्च गेला खड्ड्यात
महापालिकाप्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी (पॅचिंग) मागील पाच-सहा वर्षांत तब्बल दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला. मात्र, हा खर्च केवळ कागदोपत्रीच झाला. एकदा खड्डा बुजवला की, महिनाभरात त्याच ठिकाणी पुन्हा खड्डा तयार होतो. खड्डा भरताना त्यात खडी टाकता माती, विटांचे तुकडे, तसेच केरकचरा टाकण्यात येतो. खड्डे बुजवताना तांत्रिक बाबींकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे पॅचिंगच्या ठिकाणी पुन्हा खड्डा तयार होतो. गेल्या पाच वर्षांपासून हे चक्र असेच सुरू आहे.

खिशाला बसते झळ
गाडीच्यासस्पेन्शनचे आयुष्य साधारणपणे ३५ ते ४० हजार किलोमीटर असते, पण खड्ड्यांमुळे सस्पेंशन लवकर खराब होते. एका चारचाकी वाहनाच्या सस्पेंन्शचे काम करायचे असेल, तर ते १५ हजारांपर्यंत खर्च येतो.
खड्ड्यांमुळे होणारे विविध आजार
>रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मणक्यांचा त्रास.
>कंबरेची गादी सरकून कंबरदुखी वाढते.
>माकडहाड खाली-वर सरकल्यास पाठदुखी.
>दणक्यांमुळे हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता.
>वृध्द व्यक्तींचा पाठदुखीचा त्रास अधिक वाढतो.
असे होते दुचाकी वाहनांचे नुकसान
>टायर, ट्यूब खराब (दुरुस्तीचा खर्च ४०० ते ५०० रूपये)
>हँडेल बॉल सेट (दुरुस्ती नाही)
>सस्पेन्शन (दुरुस्ती ५०० ते ६००)
>चाकाचे बेअरिंग (दुरुस्ती नाही)
>चिमटा आऊट (दुरुस्तीचा खर्च ३०० ते ४०० रुपये)
>शॉक अ‍ॅबसॉर्बर्स (दुरुस्तीचा खर्च ४०० ते ५०० रुपये)
‘एमआरआय’साठी गर्दी
खड्ड्यांमुळेलहान-मोठ्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खड्ड्यांमुळे अनेकांना मणक्यांचे आजार जडले आहेत. शहरातील हाडांच्या रुग्णालयामध्ये नागरिकांना उपचारासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यासाठी त्यांना एमआरआय तपासणी करावी लागते. रस्ते चांगले झाले, तर ‘एमआरआय’साठी होणारी गर्दी कमी होईल.
वाहने झाली खिळखिळी
खड्ड्यांमुळे चारचाकी वाहनांचे व्हील अलायमेंट सेटिंगमध्ये अडचण होते. त्यामुळे टायर लवकर खराब होतात. त्याबरोबरच गाडीचे सस्पेंशनचे आयुष्यही १० ते १५ हजार किलोमीटरने कमी होते. गाडी दुरुस्ती घेऊन येणारा प्रत्येक जण खड्ड्यांच्या नावाने बोंब मारत असतो. खड्ड्यांचा प्रश्न सुटला, तर वाहनांच्या नादुरुस्तीचा प्रश्नही सुटेल.'' प्रसन्नवाळके, ऑटोमोबाईल इंजिनिअर.
बातम्या आणखी आहेत...