आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळामुळे कर्जत तालुक्यातून स्थलांतर सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत - तालुक्याच्या पूर्व भागात दुष्कळाची तीव्रता वाढली असून परिस्थितीने उग्र रूप धारण केले आहे. तालुक्यातील 20 कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. प्रपंचाचा गाडा हाकण्यासाठी रोजीरोटीच्या शोधार्थ काहींनी शहराची वाट धरली असून दुष्काळात पोटाची खळगी भरण्यासाठी वृद्धही काही ठिकाणी रोजगार हमीच्या कामावर जात आहेत.

दुष्काळाचा फटका सर्वच व्यवसाय व कामावरती झाला आहे. शेतमजुरांसह सुतार, लोहार, गवंडी, जनावरांचे व्यापारी, कापड व्यावसायिक आदींवरही उपासमारीची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून कर्जबाजारी होऊन सुरू केलेले कुकुटपालन, वीटभट्टी व दूध व्यवसायाला अखेरची घरघर लागल्याचे चित्र आहे. अजून तीन महिने कसे जाणार, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना सतावत आहे. तालुक्यातील चिंचोली काळदात, डिकसळ, टाकळी खंडेश्वरी, बाभूळगाव, माहीजळगाव, सीतापूर, नागापूर, नागलवाडी, निंबोडी, तरडगाव, मलठण, पाटेगाव, आनंदवाडी, निमगाव डाकू, चापडगाव आदी 20 गावांमधील कूपनलिका व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. बँका, पतसंस्थांमधील व्यवहार अल्पप्रमाणात चालू आहेत. नियोजन करून घरामध्ये ठेवलेला अन्नधान्याचा साठाही संपत आल्याने पुढे काय? हा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. छावण्यांमुळे जनावरांचा चार्‍याचा प्रश्न मिटला आहे. परंतु भविष्यात माणसांच्या छावण्या उभाराव्या लागतात की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कर्जत तालुक्यात सलग दोन वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप व रब्बी दोन्ही हंगाम दोनवेळा हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतातील विहिरी, बोअरवेल कोरड्याठाक पडल्याने या जोडधंद्यासाठी विकतचे पाणी घेऊन आर्थिक गणित जुळवताना दमछाक होत आहे. छावण्यांमध्ये चार्‍यातील विषम प्रमाणामुळे गायी कमी दूध देत आहेत.


शासकीय मदत द्यावी
आमचे हातावरच पोट असून 14 जणांचं खटलं चालवावं लागतं. दुष्काळात हाताला काम नाही, त्यामुळे जवळ पैसा नाही. कसं जगावं, नोकरदाराचं बरंय. महिना भरला की पगार होतात. आमच्या सारख्या कामगारांना दरमहा शासकीय मदत द्यावी.’’ गोरक्ष खेडकर, गवंडी.


रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करणार
दुष्काळाचा एकत्रित सामना करणे गरजेचे आहे. जनावरांकडे लक्ष देता यावे म्हणून छावणीच्या शेजारीच रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करण्यात येतील. त्याचप्रमाणे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार असून त्यावर कार्यवाही करण्यात येईल.’’ जयसिंग भैसडे, नायब तहसीलदार.


रोहयोची मजुरी वेळेवर नाही
सणासुदीचे दिवस पुढे येणार आहेत. जवळचा पैसा संपला आणि धान्य पण संपत आले आहे. महागाईचा भडका उडाला असून रोजगार हमीची पाच, पाच मस्टर भरूनही मजुरी मिळाली नाही. पोटाची खळगी कशी करायची.’’ भाऊसाहेब कोपनर, शेतकरी.