आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारखानदारांना माेकळे सोडून शेतकऱ्यांना आणले अडचणीत, रघुनाथदादा पाटील यांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याने त्याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. साखरेच्या एफआरपीसंबंधी निर्णय घेतानाही ८०:२० चा फाॅर्म्युला जाहीर करून त्यांनी ऊसउत्पादकांचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे. आता एफआरपी दिली नसलेल्या कारखान्यांचे गाळप परवाना रद्द करून कारखानदारांना मोकळे सोडून शेतकऱ्यांच्या कामधेनूला अडचणीत आणण्याचा डाव सरकारने टाकला आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला.

राज्य शेतकरी संघटनेचे देशपातळीवरील महाअधिवेशन १५ ते १७ जानेवारी शिर्डी येथे होत आहे. त्यासंबंधी माहिती देण्यासाठी पाटील यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी वार्तालाप केला. ते म्हणाले की, विद्यमान फडवणीस सरकार हे शेतकरी विरोधी आहे. काही शेतकरी संघटनांच्या नेत्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. ऊस उत्पादकांना एकरकमी पैसे देण्याऐवजी एफआरपीचे तुकडे करून कमी भाव शेतकऱ्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. केवळ साखर कारखानदारांचे हित सांभाळण्यासाठीच त्यांचा हा आटापिटा अाहे. खासदार राजू शेट्टी त्यांचे काही कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांचे समर्थन करत आहेत. एफआरपीचे दोन तुकडे करणे हे घटनाविरोधी अाहे. जे कारखाने दोन टप्प्यांत एफआरपी देणार नाहीत. त्यांचे क्रशिंग लायसेन्स रद्द करण्याचा घेतलेला निर्णय कारखानदारांना पूरक आहे. त्यातून शेतकऱ्यांची कामधेनू अडचणीत येणार आहे. मुख्यमंत्र्यांमध्ये साखर कारखानदारांवर फौजदारी दावा ठोकून त्यांना जेलमध्ये पाठवण्याची धमक आहे का? असा सवाल त्यांनी केला. सध्या सहकारमंत्री, मुख्यमंत्री, खासदार शेट्टी, सदा खोत यांच्यासारख्यांनी शेतकरी विरोधी धोरणाचा तमाशा चालवला आहे, तो त्यांनी बंद करावा.

कारखानदारांचीसंपत्ती जप्त करून एफआरपी द्या
एफआरपीसाठीक्रशिंग लायसेन्स रद्द करण्याऐवजी कारखान्यांकडील साखर जप्त करा; अथवा कारखानदारांच्या संपत्तीवर जप्ती आणून शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊन धाडस दाखवण्याची हीच वेळ होती. कारखाने बंद करून सरकार काय साध्य करणार, असा सवालही त्यांनी केला.

या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारचे कौतुक करत आहे, ही शरमेची बाब आहे. आयुष्यभर शरद जोशींनी वायदे बाजाराचे समर्थन केले. पण त्यांना विरोध करणाऱ्या खासदार शेट्टी आणि त्यांच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी वायदेबाजाराला विरोध दर्शवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आता शेतकऱ्यांचे दुश्मन ठरू पहात आहे. साखर व्यापारी योगेश पांडे याच्याशी असलेल्या हितसंबंधासाठीच शेट्टी वायदेबाजारासंबंधी हास्यास्पद भूमिका घेत आहे. शेट्टींचा वायदेबाजाराला असलेला विरोध हा त्यांच्या अज्ञानाचाच प्रकार असल्याची टीका पाटील यांनी केली.

सत्ताधारी-विराेधकांची एकी
ब्रिटिशकाळापासून आजतागायत आहे तीच सिंचन पद्धत आहे. ५० वर्षांत नवीन पाणी निर्माण केले असते, तर आज मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा प्रादेशिक वाद निर्माण झाला नसता. पाण्याच्या प्रश्नावर भाजप काँग्रेस यांच्यात सध्या तू-तू, मै-मै सुरू अाहे. त्यातून पाणीप्रश्न सुटण्याऐवजी तो आणखीच जटिल बनणार आहे. राजकारण्यांपेक्षा सिंचनतज्ज्ञांचा सल्ला विचारात घेऊन घाटमाथ्यावर पाणी अडवून संपूर्ण राज्य पाण्याबाबत स्वयंपूर्ण होऊ शकेल. मात्र, त्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळच नाही. विरोधी पक्षाचेही त्याकडे लक्ष नाही.

'स्वाभीमानी'ने स्वीकारले सरकारचे मांडलिकत्व
खासदारराजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना ही राज्य सरकारची मांडलिकत्व स्वीकारलेली स्वयंघोषित संघटना अाहे. आजवर शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलने करणारे अनिल गोटे, धोंगडे, पाशा पटेल, राजू शेट्टी हे केवळ सत्तेसाठी राजकारण्यांच्या वळचळणीला काळाच्या ओघात गेल्याने त्याचा लाभ त्यांना झाला. मात्र, शेतकऱ्यांना त्यातून काय मिळाले.

संभ्रमावस्था करण्यासाठी सरकारचा कुटिल डाव
शेतकरीहिताचेकाम करणाऱ्या संघटना सरकार सोबत जात नसल्याने तिला अडचणीत आणण्यासाठी अन्य शेतकरी संघटनांना पाठबळ देऊन शेतकऱ्यांमध्ये बुध्दिभेद करण्याचा कुटिल डाव भाजप सरकार करत आहे. सरकारशी हातमिळवणी करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी हिताच्या आड येत असल्याचा गौप्यस्फोट पाटील यांनी केला.
आत्महत्या नव्हे, हत्या
आजवरदेशात राज्यात काँग्रेस भाजपचेच सरकार राहिले असल्याने या दोन्ही सरकारांनी दीर्घकालीन शेतकरी हिताचे निर्णय घेतले नसल्याने ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांच्या सूचनांचा कायमच अनादर केल्याने आज राज्यात तीन लाखांच्यावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या नसून सरकारनेच शेतकऱ्यांच्या हत्या घडवून आणल्या आहेत, असा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केला.

अण्णा हजारे यांच्या बरोबर आम्ही नाही
शरद जोशी यांच्यापासून आमच्यापर्यंत सर्वांनी नोकरशहांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. नोकरशाहीच भ्रष्टाचाराला कारणीभूत असल्याचे आमचे मत आहे.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मात्र लोकपालच्या बाजूने असल्याने अप्रत्यक्षरित्या ते नोकरशाहांचे समर्थन करत आहे. त्यामुळे आमची शेतकरी संघटना हजारेंबरोबर गेली नाही त्यांची मदतही घेतली नाही.