आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Rain All Cattle Camp Closed In Nagar District

पावसामुळे नगर जिल्ह्यातील 568 टँकरसह सर्व छावण्या बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या मोठय़ा प्रमाणात घटली आहे. मे महिन्यात जिल्ह्यात 705 टँकर सुरू होते. सध्या अवघे 137 टँकर सुरू होते. पावसामुळे जिल्ह्यातील जनावरांच्या सर्व छावण्याही बंद झाल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 53 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

गेली दोन वर्षे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात गंभीर दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. गेल्या वर्षी 497 मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत 383 मिलिमीटर पाऊस झाला होता. तोही सर्वत्र सारखा नव्हता. त्यामुळे दक्षिण भागातील जामखेड, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, र्शीगोंदे व पारनेर या तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती.

दुष्काळामुळे जिल्ह्यात 31 मेपर्यंत 705 टँकर सुरू होते. मात्र, 1 जूनपासून पावसाला सुरुवात झाल्याने टँकरची संख्या घटली. 14 जुलैपर्यंत जिल्ह्यात 403 टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. टँकर, चारा डेपो व छावण्यांवर जिल्हा प्रशासनाने सुमारे 500 कोटींचा खर्च केला. निव्वळ चारा डेपोंवर 94 कोटी खर्च झाले. छावण्यांवर आतापर्यंत 137 कोटी खर्च झाला.

1 ते 30 जूनपर्यंत जिल्ह्यात 1,899 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरीच्या 27.28 टक्के होता. 1 ते 25 जुलैपर्यंत 3 हजार 687 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 340 मिलिमीटर पावसाची नोंद अकोले तालुक्यात झाली. 1 जून ते 24 जुलैपर्यंत अकोले 340, संगमनेर 216, कोपरगाव 226, र्शीरामपूर 249, राहुरी 209, नेवासे 203, नगर 249, शेवगाव 311, पाथर्डी 249, पारनेर 230, कर्जत 218, र्शीगोंदे 282 व जामखेडमध्ये 305 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 52 टक्के पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 214 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यात 329 मिलिमीटर, तर सर्वांत कमी 203 मिलिमीटर पाऊस नेवासे तालुक्यात झाला. आतापर्यंत सरासरी 261 मिंलिमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी अकोले-25, संगमनेर-10, कोपरगाव-15, र्शीरामपूर-23, राहुरी-14, नेवासे-11, राहाता-11, नगर-11, शेवगाव-12, पाथर्डी-11, पारनेर-13, कर्जत-20, र्शीगोंदे-18 व जामखेड- 20 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

गेल्या वर्षी 24 जुलैपर्यंत जिल्ह्यात 1631 मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा 3664 मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2033 मिलिमीटर अधिक पाऊस झाला.


मुळा धरण 51 टक्के भरले
दमदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. भंडारदरा धरणात गुरुवारी 7138, तर मुळा धरणात 13,728 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. भंडारदरा धरण 64.66 टक्के, तर मुळा 51 टक्के भरले आहे. निळवंडे धरणात 1438 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. गेल्या 11 वर्षांच्या तुलनेत सहाव्यांदा मुळा धरण जुलै महिन्यातच निम्म्या साठय़ापुढे गेले आहे.

संगमनेरमध्ये सर्वाधिक 36 टँकर
संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 36 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाथर्डी 27, नगर 25, पारनेर 13, राहाता 10, कोपरगाव 8, शेवगाव 10, जामखेड 4, अकोले 3 व राहुरीत 1 अशा एकूण 137 टँकरने सध्या पाणीपुरवठा सुरू आहे.